गणेश मूर्तीकारांवर ‘विघ्न’

कोल्हापूर: महापुराने गणेश उत्सवावर सुद्धा विघ्न आणल आहे. अनेक गणेश मूर्ती पाण्यात गेल्याने तरुण मंडळांच्या तुलनेत त्या कमी पडणार आहेत. तर मंडळांनी दिलेल्या ऑर्डरसुद्धा पूर्ण करणे कुंभार व्यवसायिकांना शक्य होणार नाही. तर दुसऱ्या बाजूला तरुण मंडळेही गणेशोत्सव साध्या पद्धतीने घेण्यासाठी बैठका घेऊन निर्णय घेत आहेत.

कोल्हापूरच्या महापुराने अनेकांचे संसार उद्धवस्त केले तसे उद्योजकांचेही मोठे नुकसान केलं आहे. याचे परिणाम आता शहरात जाणवायला सुरवात झाली. याचा पहिला फटका बसलाय तो आगामी गणेशोत्सवाला. खरतर हा मांगल्याचा उत्साहाचा सण. मात्र गणेश मूर्तीच पाण्यात गेल्याने हा सण मूर्तीविना कसा साजरा करायचा हा प्रश्न तरुण मंडळासमोर आहे. तर दुसऱ्या बाजूला मंडळांनी दिलेल्या ऑर्डर कशा पूर्ण करायच्या याची चिंता कुंभार व्यवसायिकांना लागली आहे.

खरतर एक गणेश मूर्ती तयार करायची म्हणजे त्यासाठी साधारण 10 ते 15 दिवस लागतात. मोल्डिंग, कास्टिंग, फिनिशिंग, कलरिंग अशा प्रक्रियेतून या मूर्ती बनवाव्या लागतात. मात्र हा उत्सव अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपल्यामुळे नव्या मूर्ती तयार करणेही आता शक्य नाही. महापुराच्या या फटाक्याच्या अंदाज तरुण मंडळांनाही आता येऊ लागला आहे. एका बाजूला अनेकांचे संसार उद्धवस्त झाले असताना मोठेपणाने हा उत्सव साजरा न करता साधेपणाने साजरा करण्यावर चर्चा होत आहेत. वाचलेल्या पैशातून पूरग्रस्तांना मदत करण्याचे नियोजनही काही मंडळ करत आहेत.

महापुराने सण उत्सवावर सुद्धा आता विघ्न आले आहे. मात्र विघ्नहर्ता समाजाला जाणारा गणपती हे विघ्न दूर करून नक्कीच कोल्हापूरला नवीन ऊर्जा देईल यात शंका नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×