पिंपरी: औंध-रावेत येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे आज उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या उड्डाणपुलामुळे पुणेकरांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून साई चौकामधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव यांच्यासह महानगरपालिका प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या वॉर रूमला भेट देऊन तेथील कार्यप्रणालीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. संपूर्ण राज्य ‘कोरोना’ विरोधात लढाई लढत आहे. या लढाईला जनतेचाही मोठा पाठींबा मिळत असून सामुहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्चितच हरवू, असा ठाम त्यांनी व्यक्त केलाय.