शिरूर तालुक्याची करोना हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल…

दहिवडी येथील प्रसूत महिला करोना पॉझिटिव्ह

न्हावरे(प्रतिनिधी) :- दहिवडी (ता.शिरुर ) येथील तेवीस वर्षीय महिलेचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती न्हावरे ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल कराळे यांनी दिली.

संबंधित महिला ससून रुग्णालयात प्रसुत झाली. शनिवारी (दि.२३)तेवीस वर्षीय महिलेच्या पोटात दुखू लागल्याने तिला न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्याच दिवशी तिला पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले होते. २३ मेला ह्या महिलेच्या प्रसुतीवेळी करण्यात आलेल्या उपचारादरम्यान व नंतर तिचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यानंतर स्वॅब तपासणी अहवालामधून ही महिला करोना पॉझिटिव्ह असल्याचे रात्री (दि.२८) उशिरा समजले.

दहिवडी येथील महिला करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने आरोग्य विभाग आणि तालुका प्रशासन सतर्क झाले असून सरपंच संतोष दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच आरोग्य विभागाकडून सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, करोना बाधित महिलेच्या उपचारादरम्यान तिच्या समवेत असलेला तिचा पती गेल्या दोन दिवसापासून ससून येथून बेपत्ता झाला असल्याने प्रशासनाची आणखी डोकेदुखी वाढली असून,संबंधित महिलेच्या पतीचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.