दरोड्याच्या तयारीतील दोन सराईतांसह सहा जणांना कोठडी

पुणे(प्रतिनिधी) – सिंहगड रोड परिसरातील एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना न्यायालयाने 1 जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. विकास गंगाराम राठोड (वय 20), प्रथमेश महादू येणपुरे (वय 21), अनिकेत शिवाजी घायतडक (वय 19), आकाश अरुण पवार (वय 22), जिशान हबीब अन्सारी (वय 19), योगेश रमेश जगधने (वय 25) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी, पोलीस हवालदार संतोष सुर्यकांत क्षिरसागर यांनी फिर्याद दिली आहे.

हा प्रकार 28 मे रोजी सिहंगड रस्त्यावरील हिंगणे बस स्टॉपजवळ उघडकीस आला. घटनेच्या दिवशी मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास आरोपी हे घातक शस्त्रे आणि इतर साहित्य घेऊन येथील एका बॅंकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. यावेळी, त्यांविरोधात कारवाई करत त्यांच्या ताब्यातून तीन दुचाकी, मोबाईल, शस्त्र, मिरची पुड, दोरी, टॉर्च, सॅगबॅग व रोकड असा 1 लाख 82 हजार 700 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांना अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले.

गुन्ह्यात अटक करण्यात आलेला विकास राठोड आणि जिशान अन्सारी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांविरोधात जबरी चोरी व वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी शहरात अथवा उपनगरात जबरी चोरी, दरोडा यांसारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले असण्याची दाट शक्‍यता आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या सामानही चोरीचे असल्याचा पोलिसांना संशय आहे.

आरोपी हे एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत आले होते. दरोडा टाकण्यासाठी त्यांनी साहित्य कोठुन आणले, ते नेमक्‍या कोणत्या बॅंकेच्या एटीएमवर दरोडा टाकणार होते, त्यांच्या आणखी कोणी साथीदार आहे का, याचा तपास करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील राजश्री कदम यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.