मुंबई – शेअर बाजाराचे मुख्य निर्देशांक ( Stock market index ) विक्रमी पातळीवर गेले आहेत. त्यामुळे या निर्देशांकाशी संबंधित बड्या कंपन्यांच्या शेअरची नफ्यासाठी विक्री होत आहे. परिणामी शेअर बाजाराचे मुख्य निर्देशांक आज बरेच कमी झाले. मात्र आता गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा छोट्या कंपन्यांच्या शेअरकडे वळविला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून मिड कॅप आणि स्मॉल कॅप वाढत आहेत.
नफेखोरीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 0.77 टक्क्यांनी म्हणजे 400 अंकानी कोसळून 51,703 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 104 अंकांनी कमी होऊन 15,208 अंकांवर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा मिड कॅप आणि स्मॉल कॅप आज 0.53 टक्क्यांपर्यंत वाढले होते.
एचडीएफसी बॅंक, कोटक बॅंक, टीसीएस या कंपन्याच्या शेअरची नफ्यासाठी मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर नेस्ले, बजाज फिन्सर्व, एशियन पेंट्स, इंडसइंड बॅंक, मारुती या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. मात्र या परिस्थितीतही स्टेट बॅंक, पावर ग्रीड, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्याच्याच शेअरच्या भावात वाढ झाली. ताळेबंदातील नफा कमी झाल्यामुळे नेस्ले कंपनीचा शअर आज मोठ्या प्रमाणात कोसळला.
शेअर बाजारातील घटनाक्रमाबाबत विश्लेषकांनी सांगितले की, जागतिक बाजारातून आज नकारात्मक संदेश आले. त्याच बरोबर शेअर बाजाराचे निर्देशांक विक्रमी पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदारांनी नफेखोरी केली.
माहिती तंत्रज्ञान, ग्राहक वस्तू या क्षेत्रांना नफेखोरीचा फटका बसला असला तरी सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या शेअरची खरेदी चालूच राहिली. शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळल्यामुळे रुपयाच्या किमतीवर दबाव आला. सकाळी रुपयाचा भाव मोठ्या प्रमाणात उसळला होता. मात्र बाजार बंद होताना रुपयाचा दर कालच्या तुलनेत पाच पैशांनी कमी होऊन 72 रुपये 74 पैसे प्रति डॉलर या पातळीवर राहिला.