Tribals migrate | आदिवासींचे स्थलांतर का होते ?

नवी दिल्ली – मध्य प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड आणि ओडिशा या राज्यांमधील निम्मी आदिवासी लोकसंख्या स्थलांतरित ( Tribals migrate ) झाली आहे. भारतातील अदृश्य अशा स्थलांतरित लोकसंख्येवर करोनाच्या साथीमुळे संकटांचे डोंगर निर्माण झाले. आर्थिक ताणामुळे स्थलांतरित झालेल्या लोकसंख्येमध्ये आदिवासींचे प्रमाण मोठे आहे आणि आता बहुसंख्या आदिवासींनी स्थलांतर मान्य केलेले आहे.

नागरी भागात वेगाने होणार विकास आणि अन्य गोष्टींमुळे आदिवासींचा आता त्यांच्या समाजाशी आणि गावाशी असणारा संबंध मुळापासून तुटत आहे. आदिवासी स्थलांतरासंदर्भातील माहिती गेल्या महिन्यात राष्ट्रीय आदिवासी स्थलांतर पोर्टलने जाहीर केली. त्यात याविषयीची माहिती देण्यात आली आहे.

या चार राज्यातील आदिवासींचा प्रभाव असलेल्या 27 जिल्ह्यांतील परिस्थितीचे विश्लेषण केले तर आदिवासींना त्यांचे घर का सोडावे लागले आणि ते कुठे गेले अशा प्रश्नांची उत्तरे मिळतात. चार राज्यातील 60 ते 90 आदिवासी हे चांगल्या रोजगार संधीच्या आशेने अन्य राज्यांमध्ये स्थलांतरीत झाले आहेत. अन्य राज्यांमध्ये त्यांना प्रामुख्याने घरगुती कामे, बांधकाम, शेती, कपडा उद्योग आणि मत्स्योद्योग अशा क्षेत्रात मजुरीच्या संधी उपलब्ध होतात. या सगळ्यांमध्ये वेठबिगारी, बालमजुरी आणि मानवी तस्करी अशा अनेक गंभीर समस्याही आहेत.

छत्तीसगढमध्ये 78 लाख आदिवासी लोकसंख्या आहे. त्यातील 31 टक्के आदिवासींनी रोजगारासाठी राज्यातून स्थलांतरित होण्याचा पर्याय स्वीकारलेला आहे. या 31 टक्क्यांपैकी 60 टक्के आदिवासींनी राज्याबाहेरचा मार्ग धरलेला आहे.

झारखंड राज्यात आदिवासींची लोकसंख्या 86.5 लाख एवढी आहे. त्यातील 26 टक्के आदिवासींनी स्थलांतराचा मार्ग स्वीकारलेला आहेत. या 26 टक्क्यांमधील 80 टक्के लोकांनी अन्य राज्यात जाणे स्वीकारलेले आहे.

ओडिशामध्ये 95.9 लाख आदिवासी आहेत. त्यातील 23 टक्के स्थलांतरित झालेले आहेत. या 23 टक्क्यांमधील 90 टक्के जणांनी अन्य राज्यांमध्ये जाण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे.

मध्य प्रदेशात 1.5 कोटी आदिवासी आहेत. त्यातील 21 टक्के स्थलांतरित झाले आहेत. या 21 टक्क्यांमधील 60 टक्के लोक राज्याबाहेर गेले आहेत. स्वतःच्या राज्याबाहेर गेलेले आदिवासी प्रामुख्याने गोवा, पंजाब, दिल्ली, केरळ, महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यांना पसंती देतात.

कसे होते स्थलांतर?

कुटुंबाचे स्थलांतर – हंगामानुसार ओडिशा, छत्तीसगढ आणि झारखंडमधील आदिवासी कुटुंबे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात जा-ये करत असतात.

स्त्रियांचे स्थलांतर – कपडा उद्योगात काम करण्यासाठी आणि घरगुती कामासाठी झारखंडमधील महिला दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरात स्थलांतरीत होतात.

कुटुंबातील फक्त पुरुषाचे स्थलांतर – प्रामुख्याने ओडिशातील आदिवासी पुरूष गोव्यात स्थलांतरीत होतात. तिथे त्यांना मासेमारीच्या ट्रॉलर्सवर अनेक महिने काम मिळते.

स्थलांतर का होते..?

चांगल्या रोजगार संधी आणि जास्त मजुरी हे स्थलांतरामागील सगळ्यात मोठे कारण आहे. उदाहरणार्थ – राजस्थानातील कोटा किंवा उत्तर प्रदेशातील वाराणसीत अकुशल मजुराला जी रोजची मजुरी मिळते त्या तुलनेत त्याला केरळमध्ये अडीचपट जास्त मजुरी मिळते. मजुरी मिळण्यातील अनिश्चितता, असुरक्षित वातावरण आणि इतर चिंता यामुळे देखील स्थलांतर होत राहते.

स्थलांतराचे फायदे

नागरीकरण झालेल्या भागात रोजगार मिळवून, मजुरी करून गावाकडे पैसे पाठवल्याने केवळ पावसावर ज्याठिकणची शेती अवलंबून आहे अशा भागातील दारिद्र्य कमी होण्यास मदत होते.
अनेक गावात 80 टक्के पैसा हा मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये स्थलांतरीत झालेल्यांकडून पाठवलेला असतो.अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मुस्लिम समाजातील 20 टक्के पैसा हा त्यांच्या कुटुंबातील स्थलांतरीत व्यक्तीने पाठवलेला असतो.बिहारमधील भूमिहीन आणि अत्यल्प उत्पन्न गटातील कुटुंबांच्या वार्षिक उत्पन्नापैकी सरासरी 33 टक्के पैसा हा त्यांच्या कुटुंबातील स्थलांतरीत व्यक्तीने पाठवलेला असतो.

महिलांची परिस्थिती सुधारली…

घरगुती कामासाठी, कपडा उद्योगात, बांधका आणि शेतीकामात मजुरांची मागणी वाढल्याने महिलांच्या उत्पन्नातही वाढ होत आहे. अनेक गावांमध्ये काम करणाऱ्या पुरुषांची दीर्घकाळ अनुपस्थिती असल्याने गावातील निर्णय प्रक्रियेत महिला बोलू लागल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.