मुंबई – रुपया कोसळत असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा शेअर बाजारामध्ये विक्रीचा मारा चालूच आहे. यामुळे शेअर बाजाराचा निर्देशांक शुक्रवारी कोसळले. काल परदेशी संस्थागत गुंतवणुकदारांनी तब्बल 6,644 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली असल्याची माहिती शेअर बाजारांनी आज जारी केली. आजही परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली असल्याची शक्यता आहे.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 768 अंकांनी कोसळून 54,333 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 252 अंकांनी कोसळून 16,245 अंकांवर बंद झाला.
जिआजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, रशियाने युक्रेनमधील अणु प्रकल्पावर हल्ला केल्यानंतर जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक घसरले. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला. त्याचबरोबर क्रुडचे दर काल 120 डॉलरवर गेल्यामुळे भारतामध्ये महागाई रिझर्व बॅंकेने ठरवलेल्या उद्दिष्टाच्या पुढे जाऊ शकते असे गुंतवणूकदारांना वाटत आहे.
सकाळी निर्देशांक मोठ्या प्रमाणात कोसळले होते. मात्र नंतर माहिती तंत्रज्ञान आणि औषधी क्षेत्राच्या शेअरची बरीच खरेदी झाल्यामुळे निर्देशांकांची मोठी हानी झाली नाही. मारुती सुझुकी, एशियन पेंट्स, महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांचे शेअर पाच टक्क्यांपर्यंत कोसळले. मात्र अशा परिस्थितीतही आयटीसी, डॉक्टर रेड्डीज, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. अमेरिका, हॉंगकॉंग, चीन आणि जपानमधील शेअर निर्देशांक कमी झाले होते.