नवी दिल्ली – टाटा मोटर्स कंपनीने एक फेब्रुवारीपासून आपल्या सर्व प्रकारच्या वाहनांच्या दरात 0.7% पर्यंत वाढ जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या कंपनीने जाहीर केलेल्या निवेदनानुसार परंपरागत पेट्रोल आणि डिझेल वाहनाबरोबरच इलेक्ट्रिक वाहनाच्या दरातही वाढ होणार आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे आम्हालाही दरवाढ करावी लागत आहे, असे टाटा मोटर्स कंपनीने म्हटले आहे. 1 फेब्रुवारीपासून ही दरवाढ लागू होणार आहे.
या अगोदर मारुती सुझुकी कंपनीने दरवाढ जाहीर केली होती. जानेवारीच्या अगोदरच इतर वाहन कंपन्यांनी आपली दरवाढ 1 जानेवारीपासून लागू केलेली आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. या कंपन्यांना काही सुट्या भागाची आयात करावी लागते. रुपयाचे मूल्य सध्या कमी पातळीवर असल्यामुळे ही आयात महागात पडते. म्हणून ही दरवाढ करावी लागली असल्याचे सांगितले जाते.