बेल्हे -कांदळी (ता. जुन्नर) येथील मोकसबाग वस्तीमधील एका गर्भवती महिलेचा करोनामूळे मृत्यू झाला आहे. जुन्नर तालुक्यातील रुग्णांची संख्या आता 39 वर पोहोचली आहे. करोना बळींची संख्या दोनवर गेली आहे.
कांदळीतील मोकसबाग शिवारात मृत्यू झालेल्या महिलेच्या पतीचे कांदळी फाटा येथे टायर पंक्चरचे दुकान आहे. नाशिक महामार्गावर वर्दळ आहे. दुकानात बाधित व्यक्ती त्यांच्या संपर्कात आले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हे कुटुंब परराज्यातील असून मोकसबाग येथील नागरिकांच्या घरी भाडेतत्त्वावर वास्तव्यास आहे. बाधित महिलेच्या कुटुंबातील चार जणांना लेण्याद्री येथील कोविड सेंटरमध्ये पुढील तपासणीकरिता पाठविले असल्याची माहिती सरपंच विक्रम भोर यांनी दिली.
तहसीलदार हनुमंत कोळेकर, तालुका आरोग्य अधिकारी उमेश गोडे, नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, ग्रामसेवक रंजना ढोकळ, तलाठी अमर खसाळे, शासकीय टीमने याठिकाणी भेट दिली. हा परिसर कंटेनमेंट झोन जाहीर केला आहे. गावात येणाऱ्या आणि जाणाऱ्यांना प्रवेश बंदी केली आहे. ग्रामस्थांनी घरात सुरक्षित राहून काळजी घ्यावी. होम क्वारंटाइन केलेल्यांनी गावात फिरू नये, मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्स पाळावे, कामाशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.