हद्दीबाहेरील आणखी चार जणांना करोनाची लागण
रविवार पेठ, पुणे स्टेशन परिसरातील रुग्णांचा समावेश
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल असलेल्या खडकीतील करोनाबाधित पन्नास वर्षीय महिलेचा आज (बुधवारी) मृत्यू झाला. त्यामुळे महापालिका हद्दीबाहेरील मृत झालेल्या व्यक्तींची संख्या दोनवर पोहोचली आहे. तर शहरात रहिवाशी नसलेल्या मात्र संशयित म्हणून तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयात आलेल्या आणखी चारजणांना करोनाची बाधा झाली आहे. यामध्ये पुण्यातील रविवार पेठ व पुणे स्टेशन तसेच देहूरोड परिसरातील नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे हद्दीबाहेरील मयतांची संख्या दोन झाली असून हद्दीबाहेरील बाधित रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात हद्दीबाहेरील रुग्ण उपचारासाठी येत असल्यामुळे महापालिका प्रशासनावरील ताण वाढलेला असतानाच आज पुन्हा महापालिका हद्दीबाहेरील चार रुग्णांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये 11 वर्षीय लहान मुलासह 46 वर्षीय पुरुषाचा तर 5 आणि 11 वर्षीय मुलींचा समावेश आहे.
खडकी परिसरातील रहिवाशी असलेल्या 50 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली होती. या महिलेवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. करोनाने शहरात आजपर्यत पाच जणांचे बळी घेतले आहे. त्यामध्ये शहरातील दोन व शहराबाहेरील तीन रुग्णांचा समावेश आहे. 12 एप्रिल रोजी एका पुरुषाचा मृत्यू झाला होता. सोमवारी (दि. 20) निगडीमधील एका महिलेचा मृत्यू झाला. त्याच दिवशी पुणे येथील रहिवाशी मात्र पिंपरीतील वायसीएममध्ये दाखल असलेल्या महिलेचाही मृत्यू झाला. तर आज खडकी येथील रहिवाशी असलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.