मुंबई – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे निम्मे आमदार सोबत घेत बंडखोरी केली आहे. यामुळे आता बंडखोरांविरोधात शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक होत आहे. राज्यात ठिकठिकाणी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात सुरुवात झाली आहे. याचीच खबरदारी घेत मुंबईमध्ये आता जमावबंदी लागू कऱण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गट असे चित्र सध्या निर्माण झालंय. एकनाथ शिंदे गट संख्याबळ पूर्ण करून सरकार स्थापनेच्या तयारीत लागलंय. मात्र, याचदरम्यान आता राज्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी खासदार आणि आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यास सुरूवात केलीयं.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वूमीवर एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसैनिकांना एक संदेश दिला आहे. महाविकास आघाडीसारख्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे यांचे ट्विट
प्रिय शिवसैनिकांनो,
नीट समजून घ्या, म.वि.आ. चा खेळ ओळखा..! MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित…. आपला एकनाथ संभाजी शिंदे.