वडगावशेरी : वृद्धेचे प्रेत चितेवर होते. नातेवाईकांचा आक्रोश सुरू असतानाच स्मशानभूमीचा कथित ठेकेदार आला आणि “आधी पैसे द्या, मगच अग्नि लावून देतो’ अशी अट घातली. त्यामुळे वृद्धेचे कुटुंबिय आणि नातेवाईकही हतबल झाले. मात्र, कथित ठेकेदार ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने नातेवाईकांनी मध्यस्थी करत हे प्रकरण मिटविले. परंतु तोपर्यंत मरणानंतरही हा मृतदेह तब्बल एक ते दीड तास यातना भोगत होता.
ही घटना गेल्या आठवड्यात वडगाव शेरी स्मशानभूमीत घडली. परिसरातील एका वृद्धेचे निधन झाले होते. तिच्या मुलाने सरपण विकणाऱ्या बाळासाहेब घुले नावाच्या व्यक्तीला ही माहिती दिली. त्यांना सरपण आणि गोवऱ्यांचे पैसेही दिले. मात्र, घुले यांनी आणखी दोन हजार रुपये द्या, अन्यथा चितेला अग्नि लावू देणार नाही, अशी भूमिका घेतल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.
सरपणासाठी लूट
एका चितेसाठी किमान दहा मण सरपण लागते. बाजारभावानुसार त्याची किंमत सुमारे पाच हजार रुपये आहे. मात्र, त्याची किंमत दुप्पट लावली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची लूट होत असल्याचे नागरिक सांगत आहेत.
पैसा जातो कोठे ?
सामान्य व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी महापालिकेने आर्थिक तरतूद केली आहे. त्यानुसार या साहित्यांची पावती दिल्यानंतर पैसे मृताच्या नातेवाईकांना परत मिळतात. मात्र, तोतया ठेकेदार नातेवाईकांना साहित्यांची पावती देत नसल्याचा आरोप होत आहे.
स्मशानभूमीबाबत कोणताही ठेका कोणालाही दिलेला नाही. प्रशासनाच्या नावावर कोणीही तोतयागिरी करू नये. यापुढे असे विपरीत घडल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
– श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता विद्युत विभाग, मनपा
या मृताच्या नातेवाईकांना आधी समज दिली होती. पैसे मागितले, हे वास्तव असले तरी त्यांची अडवणूक केलेली नाही. याबाबत नातेवाईकांना विश्वासात घेऊन मार्ग काढण्यात येईल.
– बाळासाहेब घुले, सरपण विक्रेता
हा प्रकार अतिशय गंभीर आणि लांच्छनास्पद प्रकार आहे. स्मशानभूमीत अशा प्रकारे वागणे योग्य नाही. याबाबत आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. तेथेही प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच कारवाई करावी.
– उषा कळमकर, माजी नगरसेविका