पुणे – सोमवार पेठ खडीचे मैदान येथील तरवडे गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. सन 1893 मध्ये बंडोबा तरवडे यांनी उत्सवाला सुरुवात केली. तेव्हापासून हा उत्सव तरवडे कुटुंबीय साजरा करत आहेत. या कुटुंबीयांच्या चार पिढ्या खाजगीरित्या स्वखर्चाने हा उत्सव साजरा करतात.
सुमारे पावणेतीन फूट उंचीची ही गणेशमूर्ती गेली 130 वर्षे जतन केली आहे. तीन राक्षस आणि त्यांचा वध करणारा गणपती अशी ही मूर्ती आहे. त्या काळात इंग्रजांच्या विरोधात स्वातंत्र्यप्राप्तीची लढाई सुरू होती. त्यामुळे त्या काळात ज्या ज्या मूर्ती बसवल्या गेल्या. त्यातील बहुतांश मूर्ती या इंग्रजरुपी दुष्ट शक्तींचे मर्दन करणाऱ्या बनवल्या होत्या. त्यातील ही एक मूर्ती असावी. अतिशय पिळदार शरीरयष्टी आणि आक्रमक स्वरूपातील ही मूर्ती आहे.
डोळ्यांना सुखवणारी शांत रोषणाई, दर वर्षी स्वरूपवर्धिनीच्या मुलांमार्फत होणारे अथर्वशीर्षपठण ही यांची वैशिष्ट्ये आहेत. आरती वा अन्य वेळी येथे कोणत्याही प्रकारचा स्पीकर किंवा डीजेचा अजिबात वापर केला जात नाही. प्रदूषणमुक्त उत्सव साजरा केला जातो. सध्या चौथ्या पिढीतील चंद्रकांत तरवडे मुख्य व्यवस्था बघतात. त्यांना इतर कुटुंबीय सहाय्य करतात.