सातारा – विघ्नहर्ता गणेशाच्या बहिणी ज्येष्ठा गौरी व कनिष्ठा गौरींचे आज गुरुवारी धन-धान्याच्या सोनपावलांनी घरोघरी मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात आगमन झाले. गणपतीच्या बहिणी असणाऱ्या या दोन गौरी माहेरवाशिणी म्हणून दरवर्षी गणेशोत्सवात भाद्रपद शुक्ल सप्तमीच्या मुहूर्तावर येऊन दोन दिवसाचा मुक्काम करत नवमीला परत जातात अशी प्रथा आहे. आज गुरुवारी दुपारी 3 वाजून 35 मिनिटांपर्यंत गौरीच्या आगमनाचा मुहूर्त असल्यामुळे जिल्ह्यातील घराघरांमध्ये महिलांची विशेष लगबग होती.
आल्या आल्या गौरी गौरी, कशाच्या पावलांनी… गौरी आल्या लक्ष्मीच्या पावलांनी, सोन्या रुप्याच्या, मोत्याच्या पावलांनी… असे म्हणत महिलांनी घरातील तुळशी वृंदावनापासून तसेच काहींनी पाणवट्यावरून या गौरीचे स्वागत केले. घरामध्ये आल्यावर त्यांचे औक्षण करून उंबरठ्यावर ठेवलेले धान्याचे माप ओलांडून सनईच्या मंगल सुरात त्यांना आगत स्वागत करत त्यांचे औक्षण केले.
अनेक घरांमध्ये ज्येष्ठा गौरी व कनिष्ठा गौरींचे आगमन झाल्यावर त्यांना पूजन करून गणेशाच्या पुढे अतिशय भव्य रूपात साकारण्यात आले. त्यानंतर गौरीची विशेष पूजा करून दूध साखरेचा नैवेद्य दाखवून आरती करण्यात आली. सायंकाळी घरोघरी खीर -पुरी तसेच शेपूच्या भाजी, भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला. अनेक घरांमधून उभ्या गौरी नसल्यामुळे त्यांना गंगा गौरी म्हणत पाणवठ्यावरून पाच खड्यांची पूजा करत तसेच हिरव्या पत्रींचे रूपात या गौरीला पूजन करत घरोघरी बसवण्यात आले.
शुक्रवारी गौरी पूजनाचा मुख्य दिवस असल्याने या दिवशी घरोघरी पुरणपोळी तसेच गोडधोडाचा नैवेद्य करून दाखविला जातो. बाजारपेठेतही गेले दोन दिवस गौरीच्या पुढे मांडण्यात येणाऱ्या विविध गोड व तिखट पदार्थांच्या खरेदीसाठी आणि गौरीच्या सजावटीमध्ये शोभेचे दागिने खरेदीसाठीही महिलांची विशेष गर्दी होती. शनिवारी या गौरींचे विधीवत विसर्जन केले जाणार आहे.