बर्लिन – आमिर खानचा प्रसिद्ध “गजनी’ सिनेमात त्याची स्मरणशक्ती दर 15 मिनिटांनी जात असल्याचे आठवत असेल. अशाप्रकारे “शॉर्ट टर्म मेमरी लॉस’ अर्थात अल्पावधीतच स्मरणशक्ती जाणे कल्पनाविलास वाटला होता. मात्र, ही गोष्ट जर्मनीतील एका व्यक्तीच्याबाबतीत खरोखरच घडते आहे. डॅनियल श्मिट असे या व्यक्तीचे नाव आहे. सहा वर्षांपूर्वी एका कार अपघातानंतर त्याची स्मरणशकती अल्पमुदतीची बनली आहे.
एका माहितीपटाद्वारे त्याची ही कथा प्रकाशात आणली गेली आहे. अपघात कसा झाला, कोठे झाला हे तपशील ते आपल्या जवळच्या नोंदी वाचून सांगू शकतात. मात्र, त्यानंतरचे काहीही त्यांना आठवत नाही. मोटरसायकल चालवत असताना एका कारने त्यांना मागून ठोकर दिली एवढेच त्याला आठवते आहे.
या अपघातानंतर श्मिट यांना या अपघातानंतर 6 तासांपेक्षा अधिक काहीही लक्षात ठेवता येईना. आपण काय केले किंवा काय करायला पाहिजे हे ते लिहून ठेवायला लागले आहेत. महत्त्वाच्या सर्व गोष्टींच्या नोंदी असलेली डायरी त्यांना आपल्याबरोबर बाळगावी लागते आहे.
त्यांना आपली पूर्वीची पत्नीदेखील आठवेना. तिच्याशी काय बोललो हेदेखील लिहून ठेवायला लागले. फोटोही सांभाळून ठेवावा लागला. अन्यथा तिला एखाद्या अनोळखी व्यक्तीप्रमाणे ते वागवण्याचीही भीती आहे. काही वर्षांपूर्वी त्यांना एक मुलगा झाला होता. त्याचा जन्मदेखील श्मिट यांना आठवत नाही.