मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली असून आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे. यामुळे दिवसेंदिवस त्यांच्यासमोरील अडचणीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच, सचिन वाझेला देखील 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे.
या अगोदर न्यायालयीन कोठडी सुनावण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाच्या विशेष सुट्टीकालीन एकलपीठाने रविवारी रद्द केला होता. तसेच देशमुख यांना 12 नोव्हेंबपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावली गेली होती.
त्यानंतर त्यांची कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश ईडीने दिले होते. आता पुन्हा एकदा त्यांना 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांनी न्यायालयाला घरच्या जेवणाला परवानगी देण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांची ही विनंती न्यायालयाने फेटाळून लावली. तुम्ही आधी कारागृहातील जेवण खा. त्यानंतर विचार करण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले. मात्र, त्यांची प्रकृती पाहता न्यायालयाने त्यांची बेडसाठीचे अपील मान्य केले.
दरम्यान, देशमुख यांना 2 नोव्हेंबर रोजी मनी लॉंड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली होती. अंमलबजावणी संचालनालयाने मुंबईतील त्यांच्या कार्यालयात 12 तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली. मुंबईचे माजी पोलीस अधिकारी परमवीर सिंग यांनी केलेल्या लाचखोरीच्या आरोपांमुळे देशमुख यांनी या वर्षाच्या सुरुवातीला आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.