येरवडा- पुणे-नगर रस्त्यावर रामवाडी येथे छत्रपती संभाजी महाराज चौकात (रामवाडी पंपिंग स्टेशन) चेंबरसची झाकणे तुटली आहेत. त्यामुळे गंभीर अपघाताचा धोका आहे. त्यामुळे हे चेंबर त्वरित दुरुस्त करावे, अशी मागणी तुकाई माता सेवा ट्रस्टचे प्रमोद देवकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
या रस्त्यावर गरज नसताना काही महिन्यांपूर्वी पावसाळी जलवाहिनी टाकण्यात आली. येथे अंदाजे 3 फुटांचे दोन मोठे पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठीचे चेंबर तयार करण्यात आले. यावर लोखंडी जाळीदार झाकणे लावण्यात आली. परंतू या दोन्ही चेंबरवरील जाळी निकृष्ट दर्जाची आहे. त्यामुळे ती खचली आहेत. या चौकात पादचारी आणि वाहनांची सदैव वर्दळ असते. यात एखाद्याचा पाय किंवा वाहनाचे चाक अडकून मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे पालिकेने ही दुरुस्ती त्वरित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.