चिंबळी – “नकटीच्या लग्नात सतराशे’ विघ्न या म्हणीचा प्रत्यय चिंबळी (ता. खेड) येथील ग्रामस्थ घेत आहेत. चिंबळी फाटा ते केळगाव रास्त्यावरील चिंबळी फाटा येथील रस्त्याच्या चढाच्या दुरुस्तीचे काम पुन्हा रखडले असून अंदाजे 70 मीटर राहिलेल्या सिमेंट कॉंक्रेटिकरणाच्या कामात टाकण्यात आलेल्या ड्रेनेज लाईनमुळे रस्त्याचे काम करण्यास अडचण येत असल्याचे कारण पुढे करत सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम थांबविले आहे.
याबाबतचे पत्र देखील त्यांनी ग्रामपंचायतीला दिले आहे, तर ग्रामपंचायतीने देखील यात आपला हस्तक्षेप नसल्याचे पत्र बांधकाम विभागाला दिले आहे. यामुळे पुन्हा कागदी घोडे नाचविण्यास सुरुवात झाली असून मूळचे दुःखणे कायम राहिल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे.
सोळूतील रस्ता वर्षभरातच उखडला
चिंबळी-आळंदी-मरकळ रस्त्यावर सोळू (ता. खेड) येथे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून वाहनचालकांना या धोकादायक खड्ड्यांमधून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. गेल्यावर्षीच दुरुस्त करण्यात आलेल्या या रस्त्यावर पहिल्याच पावसात खड्डे पडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्न उपस्थित होत आहेत. सोळूच्या मुख्य चौकात हे खड्डे असून त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहेत. या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात घडत आहेत. नागरिकांना पायी चालणेही अवघड झाल्याने नाराजी व्यक्त होत असून या भागातील खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
ड्रेनेज लाईनचा प्रश्न ऐरणीवर
दोन्ही पत्राने नक्की जबाबदारी कोण आणि निभावणार हे स्पष्ट होत नसून वर्षभरापूर्वी ज्या कारणामुळे हे काम अडले त्या ड्रेनेज लाईनचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सामान्य नागरिक मात्र जीव धोक्यात घालून आजही रस्ता दुरुस्त होईल या आशेवर बसले आहेत.
अधिकाऱ्यांचे नक्की चाललंय काय?
रस्त्याचे काम सुरू झाले तेव्हाच ड्रेनेज लाईन टाकण्यात येत होती तरीही पश्चिमेच्या बाजूने रस्त्याचे काम सुरू होते. पूर्वेच्या बाजूने काम सुरू होताच ड्रेनेजचे काम अधिकाऱ्यांना दिसले का ? रस्ता दुरुस्त करणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम असताना गेले दोन-तीन वर्षे अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवत आहेत. प्रत्यक्ष काम सुरू झाले अन् गरजेच्या ठिकाणीच अडले असे का? स्वतःचे अधिकार वापरून अधिकारी काम करणार की नाही? कोणच्या दबावाखाली अधिकारी आहेत की यामागे अर्थकारण आहे? असे असंख्य सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.