नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करा : खा. विखे

शेख व शिंदे कुटुंबियांचे सांत्वन

तालुक्‍यातील शिंपोरा येथील मोहम्मद शेख व मानेवाडी येथील दादा शिंदे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. विखे यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.  

कर्जत – तालुक्‍यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनीमंगळवारी (दि.5) पाहणी केली. नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. महिनाभरात शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले. कर्जत तालुक्‍यातील भांबोरा येथून विखे यांनी दौऱ्यास सुरुवात केली.

शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. उपस्थित शेतकऱ्यांशी त्यांनी विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यानंतर बारडगाव सुद्रिक भागास भेट दिली. हनुमान मंदिरासमोर शेतकऱ्यासमवेत बैठक घेतली. त्यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक अंबादास पिसाळ, युवा नेते दादासाहेब सोनमाळी, साधना कदम, शिवसेनेचे दीपक शहाणे, रिपाईचे संजय भैलुमे, संजय सुद्रिक, प्रा. अशोक पावणे, कृषी अधिकारी रुपचंद जगताप, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. पुढे त्यांनी गणेशवाडी, करमनवाडी, खेड, शिंपोरा, मानेवाडी, करपडी, बेनवडी आदी भागात भेट देऊन पाहणी केली. दौऱ्यादरम्यान हेमंत मोरे, बंटीराजे मोरे, सचिन मोरे आदींनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नाकडे विखे यांचे लक्ष वेधले.

Leave A Reply

Your email address will not be published.