सात-बारा उताऱ्यानुसार सरसकट पंचनामे करा : आ. काळे

कोपरगाव  – अवकाळी पावसाने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान खूप मोठे आहे. या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे न झाल्यास शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची तीव्रता लक्षात घेवून पंचनामे करताना सात-बारा उताऱ्यानुसार सरसकट पंचनामे करा, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पिकाची पाहणी करताना अधिकाऱ्यांना दिल्या.

आ. काळे यांनी कोपरगाव मतदारसंघातील कोकमठाण, सडे शिवारातील शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, कोकमठाणचे तलाठी एस. बी. चाकणे, ग्रामसेवक बी. बी. गायकवाड, कृषी सहायक पी. जी. जाधव, सडे गावचे तलाठी डी. सी. वडीतके, ग्रामसेवक गोरक्षनाथ कार्ले, कृषी सहायक अविनाश पिंगळे आदी पंचनामा करणारे प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

कायमस्वरूपी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या कोपरगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने शिवार फुलविले होते. मात्र मागील काही आठवड्यापासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे अपरिमित नुकसान होऊन होत्याचे नव्हते झाले आहे. त्यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे नष्ट झाला असून, रब्बी पिके उभे करायचे, कसे असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला असताना खरिपासाठी काढलेलं कर्ज फेडायचे कसे, या चिंतेने शेतकरी ग्रासला आहे. त्यामुळे जर शेतकऱ्यांचे वेळेत पंचनामे झाले नाही व शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहू शकतात, याची खबरदारी पंचनामा करणाऱ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी.

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पंचनामे करतांना हलगर्जीपणा केल्यास खपवून घेतले जाणार नाही, असा सूचक इशारा त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, सुदाम लोंढे, प्रसाद साबळे आदी कार्यकर्त्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टंचाईग्रस्त गावांमध्ये करण्यात येणाऱ्या उपाययोजना करण्याबाबत आ. काळे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, सभापती अनसूयाताई होन, उपसभापती अनिल कदम, पंचायत समितीचे गटनेते अर्जुनराव काळे, सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, कारभारी आगवन, राहुल रोहमारे, रोहिदास होन, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, कृषी अधिकारी अशोक आढाव आदी उपस्थित होते. यावेळी आ. काळे यांनी वस्तुनिष्ठ पंचनामे करून शासनास अहवाल पाठविण्याच्या सूचना यावेळी केल्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here