मेसेजद्वारे येणारी लिंक मारु शकते डल्ला

आर्थिक फसवणुकीचा नवा फंडा : सायबर विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन

पिंपरी – सवलत, बक्षीस किंवा तुमच्या बॅंक खात्यात मोठी रक्‍कम वर्ग केल्याचे आमिष दाखवून नागरिकांना लिंक पाठविली जाते. या लिंकद्वारे अगदी थोडी रक्‍कमही ऑनलाइन पाठविण्यास सांगितले जाते. या आमिषाला बळी पडून अनेकजण लिंकवर माहिती पाठवितात. मात्र त्यानंतर अगदी थोड्याच वेळात नागरिकांच्या खात्यावरील रक्‍कम लंपास होते. अगदी उच्चशिक्षितही या फसवणुकीचे बळी ठरत असून नागरिकांनी अशा लिंकपासून दूर रहावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाच्या सायबर विभागाने केले आहे.

सायबर गुन्हेगारांनी सध्या नागरिकांशी संबंधित असलेल्या अनेक कंपन्यांच्या नावे बनावट संकेतस्थळे निर्माण केलेली आहेत. ऑनलाईन या संकेतस्थळाचा शोध घेतात. संकेतस्थळावर दिलेल्या कस्टमर केअरच्या नंबरवर फोन करतात आणि येथूनच नागरिकांच्या फसवणुकीला सुरुवात होते. तुमची गॅसची बुकींग क्‍लोज केली आहे. ती पुन्हा सुरू करायची असल्यास आम्ही एक लिंक पाठवितो. त्या लिंकवर तुमची माहिती भरून द्या आणि दहा रुपयांचे ऑनलाइन पेमेंट करा, असे सांगितले जाते. माहिती भरून घेताना डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचा क्रमांक आणि सीव्हीव्ही क्रमांकही घेतात. नागरिकांची गरज महत्वाची असल्याने अनेकजण माहिती भरून देतात. त्यानंतर बॅंकेतील पैसे आपोआप लंपास होतात.

सायबर गुन्हेगार निवडतात रात्रीची वेळ
मध्यरात्री नागरिक झोपलेले असतात. अशावेळी सायबर गुन्हेगार बॅंकेत ऑनलाइन पैसे काढून घेतात. काहीजण आपला मोबाईल रात्रीच्यावेळी बंद किंवा सायलेन्ट मोडवर टाकतात. त्यामुळे बॅंकेतील पैसे कट झाल्याचा मेसेज त्यांना वेळेवर मिळत नाही. काही जणांना मेसेज मिळतो. मात्र जाणारे पैसे कसे थांबवायचे याबाबत माहिती नसते. सकाळपर्यंत सायबर गुन्हेगार आपले बॅंक खाते रिकामे करतात.

अशी होते फसवणूक
अनेकजण आपली जुनी वस्तू ओएलएक्‍सवर विक्रीसाठी जाहिरात करतात. ही जाहिरात पाहून सायबर गुन्हेगार संबंधित व्यक्‍तीला फोन करून तुमची वस्तू आम्ही खरेदी करण्यास तयार असल्याचे सांगतात. चांगली किंमत मिळत असल्याने जाहिरात टाकणाराही खूश असतो. तुमच्या वस्तूची किंमत तुम्हाला ऑनलाइन देतो. त्यासाठी तुमचा “गुगल पे’चा क्रमांक पाठवा, असे सांगितले जाते. मात्र अनेकांकडे हे ऍप नसते. यामुळे आम्ही लिंक पाठवितो. त्यावर तुमच्या बॅंक खात्याची माहिती द्या. त्यावर वस्तूचे पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करतो. पैसे मिळाल्यावरच वस्तू द्या, असेही सांगितले जाते. माहिती भरून दिल्यावर खात्यात पैसे येणे तर सोडाच परंतू खात्यातील पैसेही हातोहात लंपास केले जातात. काही जणांकडे गुुगल पे ऍप असते. त्यांना आम्ही कोड पाठवितो तो स्कॅन करा, मग आम्ही तुमच्या खात्यात त्याद्वारे पैसे देऊ, असे सांगितले जाते. मात्र या लोगोखाली लिहिलेले “पे टू’ या वाक्‍याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात आणि त्यांची फसवणूक होते.

“नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्‍लिक करू नये. तसेच लिंकद्वारे आपल्या बॅंक खात्याची कोणतीही माहिती देऊ नये. गुगल पे द्वारे पैसे देताना “पे टू’ असे वाक्‍य आहे की रिसिव्ह आहे हे पाहणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्या खात्यावरील पैसे चोरीस जाऊ शकतात.”
– सुधाकर काटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर सेल

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)