स्वारगेट-भोर विनाथांबा एसटीसाठी दोन तास प्रवाशांच्या रांगा
भोर – स्वारगेट-भोर विनावाहक बसच्या बुकिंग मशिनचा पेपर रोल संपल्याच्या कारणावारून स्वारगेट बस डेपोतून भोरला येणाऱ्या बस दुपारी एक वाजल्यापासून डेपोतच रखडून राहिल्याने प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. तिकिट बुकिंगसाठी रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या या गलथान कारभाराविषयी संताप व्यक्त
केला आहे.
मंगळवारी दुपारी 1ः00 वाजता स्वारगेट डेपोत भोरवरून आलेली बस वेळेत पोहोचली. मात्र खिडकित बसून प्रवाशांना तिकिटे देणाऱ्या कंडाक्टरकडील बुकिंग मशिनचा पेपर रोल संपल्याने तो एक तासाहून अधिक काळ गायब झाल्याने प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. यानंतर तीन बस डेपोत दाखल झाल्या, मात्र प्रवाशांना तिकिटेच मिळाली नसल्याने प्रवाशांचा खोळंबा होऊन अनेकांना त्यांची महत्त्वाची कामे वेळेवर करता आली नाही आणि भोरलाही पोहचता न आल्याने प्रवाशांना याचा त्रास सहन
करावा लागला.
तिकिटेच मिळाली नसल्याने प्रवाशांचा झाला खोळंबा
भोर डेपोचा हा गोंधळ कायमच सुरू आहे. प्रवाशांना तिकिट बुकिंगवेळी बुकिंग कंडक्टर चांगली वागणूकही देत नाहीत. त्यांच्याशी वाद घातले जातात. याविषयी अनेकवेळा भोर आगार प्रमुखांना लेखी, तोंडी माहिती देऊनही त्यांच्याकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. सध्या गेल्या दोन-तीन महिन्यांपासून रोजच पाऊस कोसळत आहे. त्यातच एसटीच्या प्रवाशांना आता या गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. बुकिंगचे पेपर रोलचा अतिरिक्त साठा कंडक्टरकडे असणे आवश्यक आहे. – राजू शिंदे, सामाजिक कार्यकर्ते, भोर
एसटी महामंडळाच्या कारभाराविषयी प्रवाशांमध्ये संताप