नवी दिल्ली – नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना जामीनावर सोडण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी दाभोळकर यांच्या कन्येची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात दोन मोटरसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.
न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि एसव्हीएन भाटी यांच्या खंडपीठाने सांगितले की, उच्च न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर करताना तर्कसंगत आदेश दिला आहे.त्यामुळे त्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण आम्हाला दिसत नाही असे नमूद करीत सर्वोच्च न्यायालयाने मुक्ता दाभोळकर यांची याचिका फेटाळून लावली.
या सुनावणीच्यावेळी मुक्ता दाभोलकरची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील आनंद ग्रोव्हर यांनी नमूद केले की, हे एक गंभीर प्रकरण आहे ज्यात फॉरेन्सिक तपासणीदरम्यान एका साक्षीदाराने या हत्येत आरोपींचा सहभाग असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.
दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी विक्रम भावे याला जामीन मंजूर करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या ६ मे २०२१ रोजीच्या आदेशाच्या विरोधात मुक्ता यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. भावे यांच्यावर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोन आरोपींना मदत केल्याचा आरोप आहे, ज्यांनी 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे.
कळसकर यांनी दिलेल्या जबानीच्या आधारे सीबीआयने २५ मे २०१९ रोजी वकील संजीव पुनाळेकर यांच्यासह भावे यांना अटक केली होती. पुनाळेकर यांना पुण्यातील सत्र न्यायालयाने जून २०१९ मध्ये जामीन मंजूर केला होता. पुण्यातील सत्र न्यायालयाने भावे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर भावे यांनी २०२१ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
या गुन्ह्यातील कथित सूत्रधार वीरेंद्रसिंह तावडे याच्यावर पुण्याच्या विशेष न्यायालयाने २०२१ मध्ये आरोप निश्चित केले आहेत. त्यात तावडे आणि इतर तिघांवर खून, गुन्हेगारी कट आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांचा आरोप होता. दुसरा आरोपी संजीव पुनाळेकर याच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे.