हैदराबाद – तेलंगणातील भारत राष्ट्र समितीचे (BRS) अध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (k chandrashekhar rao) यांनी आश्वासन दिले आहे की त्यांचे सरकार पुन्हा आले तर राज्यात केवळ मुस्लिमांसाठी आयटी पार्क सुरू केले जाईल. त्यावरून कॉंग्रेसचे नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (d k shivkumar) यांनी टीका केली असून केवळ मुस्लिमांसाठी आयटी पार्क कसा काय करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. (Telangana politics)
संपूर्ण देशात आपण कुठेही असे धोरण ऐकलेले नाही आणि मुळात ते कसे शक्य आहे अशी विचारणा करताना शिवकुमार म्हणाले, तुम्ही (राव) युवकांसाठी आणि महिलांसाठी काही करू शकता. मात्र एका विशिष्ट जाती अथवा धर्मासाठी अशी घोषणा करून भेदभाव करू शकत नाहीत.
मला वाटते राव यांनी असे करून स्वत:ला दुबळे बनवले आहे. युवा, महिला अथवा लहान मुले यांची कोणती जात नसते. तुम्ही अल्पसंख्याकांसाठी काही विशेष करून त्यांना प्रोत्साहित करू शकतात. तथापि, त्यांच्यासाठी असे वेगळे आयटी पार्क तयार करू शकत नाही.