पिंपरी, दि. ८ – १ जानेवारी २०२३ रोजी देशपातळीवरील छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा आरंभ बुधवारी (दि. ९ नोव्हेंबर) पुणे येथे होणार आहे. शहरी मतदार आणि युवकांचा मतदार प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी पुणे येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. बुधवारी बालेवाडी येथे सकाळी साडेसहा वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथून सकाळी सहाला रॅली निघणार आहे.
मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम आगामी काळातील निवडणुकांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. यानिमित्ताने मतदार जागृतीसाठी विविध उपक्रमाचे आयोजनही करण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्या उपस्थितीत मतदार नोंदणीविषयी जनजागृती करण्यासाठी बुधवारी बालेवाडी येथे सकाळी साडेसहा वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून पुणे शहराच्या विविध भागातील नागरिकांमध्ये जनजागृतीसोबतच त्यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मतदान नोंदणी अभियानाच्या माध्यमातून नवीन मतदार नोंदणी करण्यात येणार आहे, शिवाय याठिकाणी केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या विभागीय कार्यालयातर्फे मतदार जागृतीसाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट करुन घेण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोग वंचित घटकांनाही महत्व देत असल्याने दोन्ही निवडणूक आयुक्त याच ठिकाणी तृतीयपंथीय समुदायाशी संवाद साधणार आहे.
उद्योग क्षेत्रातील संघटित व असंघटित कामगारांचा निवडणूक प्रकियेत सहभाग वाढविण्यासाठी हिंजेवडी येथील टेक महिंद्रा कंपनीच्या सभागृहात विविध उद्योगसंस्थांमध्ये स्थापन झालेल्या मतदार जागृती मंचच्या प्रतिनिधींशी संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांना निवडणूक प्रकियेत सहभागी करण्यासाठी, मतदार नोंदणी विषयी जागृती करण्यासाठी सिम्बायोसिस विद्यापीठ येथे 10 नोव्हेंबर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे.
पुनरीक्षण उपक्रमांतर्गत एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ असा आहे. दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीमध्ये राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या दोन शनिवार आणि रविवार विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहे. तर २६ डिसेंबर २०२२ पर्यंत दावे व हरकती निकालात काढले जाणार आहेत. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी २०२३ रोजी करण्यात येणार आहे.
वाहतुकीत बदल
शिवछत्रपती क्रीडा संकुल येथून निघालेली सायकल रॅली पुणे विद्यापीठ व परत बालेवारी येथे येणार आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक वळविण्यात आली आहे. हिंजवडी वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीतील हा बदल बुधवारी पहाटे पाच ते सकाळी नऊ या वेळेसाठी करण्यात आला आहे.
# बालेवाडीकडून राधा चौकमार्गे बाणेरकडे जाणारी वाहने राधा चौकातून न जाता इतर मार्गांनी जातील.
# न्याती शोरूमकडून सेवा रस्त्याने राधा चौकात येणारी वाहने ही मुख्य महामार्गावरून पुढे भुजबळ चौक (वाकडनाका) सेवा रस्त्याने इच्छित स्थळी जातील.
# भुजबळ चौकातून (वाकडनाका) सेवा रस्त्याने राधा चौकात येणारी वाहने ही राधा चौकात न येता इतर पर्यायी मार्गाने इच्छित स्थळी जातील.