World Cup 2023 South Africa vs Bangladesh Match : मला सातत्याने संघाबाहेर ठेवले जात होते. मला दुखापतही झालेली नव्हती तसेच मी स्वतःहून माघारही घेतली नव्हती. मात्र, तरीही गेल्या दोन मोसमांमध्ये मला जाणूनबुजून संघात निवडले जात नव्हते. अशी टीका दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत दमदार शतकी खेळी केलेल्या बांगलादेशचा फलंदाज महंमदुल्लाहने आपल्याच क्रिकेट मंडळावर केली आहे.
पुढे महंमदुल्लाह म्हणाला की, मला केवळ विश्रांती दिली जात आहे, असेच कारण मंडळाकडून सांगण्यात येत होते. नवोदितांना रोटेशननुसार खेळवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचेही सांगितले गेले. मात्र, संघातील नवोदितांकडून साफ निराशा झाल्यामुळे मला पुनरागमनाची संधी देण्यात आली. मात्र, मला मंडळाचा निर्णय पटला नाही व पटणारही नाही, असे महंमदुल्लाह म्हणाला.
#CWC23 #SAvBAN : फलंदाजां पाठोपाठ गोलंदाजही चमकले, द. आफ्रिकेचा बांगलादेशवर दणदणीत विजय…
दरम्यान, एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 23व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 5 गडी गमावून 382 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 46.4 षटकात केवळ 233 धावा करू शकला. बांगलादेश संघाकडून फलंदाजीत केवळ महमुदुल्लाह दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर उभा राहू शकला आणि त्याने 111धावांची शानदार खेळी केली. मात्र त्याची खेळी संघाला उपयोगी पडू शकली नाही.