World Cup 2023 India vs Bangladesh Match – एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 17 व्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला आहे. भारताचा या स्पर्धेतील हा सलग चौथा विजय असून टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना आठ गडी गमावून 256 धावा केल्या आणि विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने तीन विकेट गमावून हे लक्ष्य गाठले.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आठ गडी गमावून 256 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 41.3 षटकांत तीन गडी गमावून 261 धावा केल्या आणि सामना जिंकला. विराट कोहलीने षटकार लगावत भारताचा विजय साकार केला. तसेच या षटकारासह त्याने वनडे क्रिकेटमधील 48 वे शतकही पूर्ण केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडूलकरच्या नावे सर्वाधिक 49 शतकं आहेत आणि या विक्रमापासून कोहली एक शतक मागे आहे.
दरम्यान, आजच्या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यादरम्यान बांगलादेशच्या डावाच्या नवव्या षटकात हार्दिकच्या पायाला दुखापत झाल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला. फिजिओ त्याच्या डाव्या बाजूला पट्टी लावताना दिसला, पण तो षटक पूर्ण करू शकला नाही. त्याने आधीच तीन चेंडू टाकले होते. उर्वरित तीन चेंडू विराट कोहलीने टाकले. 2017 नंतरचा हा पहिला एकदिवसीय सामना होता ज्यात विराटने गोलंदाजी केली.
विराटने आठ वर्षांनंतर विश्वचषकात केली गोलंदाजी…
विराटने शेवटच्या वेळी ऑगस्ट 2017 मध्ये कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध वनडेमध्ये गोलंदाजी केली होती. याशिवाय त्याने एकदिवसीय विश्वचषकात चार वेळा गोलंदाजी केली आहे. त्याने आठ वर्षांनंतर विश्वचषकात गोलंदाजी केली. विराटने 2011 विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि अंतिम फेरीत श्रीलंकेविरुद्ध गोलंदाजी केली होती. याशिवाय 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये त्याने गोलंदाजी केली होती.
काय झालं त्या षटकात? विराटची गोलंदाजी अन् चाहत्यांचा जल्लोष…
हार्दिकच्या नवव्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर बांगलादेशी फलंदाजाने दोन चौकार मारले होते. यानंतर अष्टपैलु हार्दिक पंड्याला गोलंदाजीदरम्यान दुखापत झाल्यामुळे मैदान सोडावे लागले. मात्र, त्याच्या षटकातील उर्वरीत 3 चेंडू गोलंदाजी करण्यासाठी विराट कोहलीने आपल्या हाती चेंडू घेतला. या वेळी स्टॅंडमध्ये असलेल्या हजारो चाहत्यांनी तुफान जल्लोष केला.
Look who rolled over his arm over! 😎
Follow the match ▶️ https://t.co/GpxgVtP2fb#CWC23 | #TeamIndia | #INDvBAN | #MeninBlue | @imVkohli pic.twitter.com/wjTPSLR6BW
— BCCI (@BCCI) October 19, 2023
कोहलीने या तीन चेंडूत केवळ 2 धावाच दिल्या. चौथ्या चेंडूवर त्याने एकही धाव दिली नाही. पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर प्रत्येकी एक धाव आली. मात्र, प्रत्येक चेंडू टाकण्यासाठी त्याने रनअप सुरु केली की प्रेक्षक प्रचंड जल्लोषात कोहली… कोहली… असा जयघोष करत होते. हे तीन चेंडू टाकून पूर्ण झाल्यावर कोहलीनेही देखील प्रेक्षकांना अभिवादन केले. विराट कोहली चष्मा लावून गोलंदाजी करताना दिसला. त्याच्या गोलंदाजीचा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे. बीसीसीआयनेही फोटो शेअर केले आहेत.
Not something you see everyday as Virat Kohli takes to the bowling crease against Bangladesh 👀#CWC23 | #INDvBAN
Watch here: https://t.co/oAoVPL85WT
— ICC (@ICC) October 19, 2023
हार्दिक पांड्याला दुखापत…
या सामन्यात फक्त तीन चेंडू टाकल्यावर हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला. चेंडू टाकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न करताना त्याच्या पायाचे स्नायू दुखावले गेले. यामुळे त्याला पुढे गोलंदाजी करता आली नाही. विराट कोहलीने त्याच्या ओव्हरचे उर्वरित तीन चेंडू टाकले. हार्दिकच्या दुखापतीची तीव्रता समजू शकलेली नाही, मात्र त्याला स्कॅनिंगसाठी रुग्णालयात नेलं असून त्याचे दुसऱ्या डावात फलंदाजीला येणे कठीण दिसत आहे. दरम्यान, हार्दिक पांड्याची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत स्कॅनिंगनंतरच स्पष्टता येणार आहे. हार्दिक पांड्याची दुखापत भारतासाठी चिंता वाढवणारी आहे.
विराटची गोलंदाजी कारकीर्द
विराटच्या गोलंदाजी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने एकदिवसीय आणि T20 आंतरराष्ट्रीय दोन्हीमध्ये प्रत्येकी चार विकेट घेतल्या आहेत. 15 धावांत एक विकेट ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय टी-20 मधील त्याची सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे 13 धावांत एक बळी. आयपीएलमध्येही त्याने केवळ चार विकेट्स घेतल्या आहेत. त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे 25 धावांत दोन बळी.