8 वर्षांत 31 हजार वृक्षांवर कुऱ्हाड

15 हजार झांडांचे पुनर्रोपण; मात्र पुनर्रोपणाची ठिकाणेच गायब

पुणे -महापालिकेची विकासकामे तसेच बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पात अडथळे ठरणारी तब्बल 31 हजार 313 झाडे पूर्णपणे काढण्यास वृक्षप्राधिकरण समितीने गेल्या 8 वर्षांत मान्यता दिली आहे. त्यातील सुमारे 14 हजार 845 झांडांचे पुनर्रोपण करण्यात येत असले तरी हे वृक्ष नेमके कोठे आणि कोणत्या जागेवर पुनर्रोपण केले याची यादीच नसल्याने ही माहिती संकलित करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. नगरसेवक युवराज बेलदरे यांनी ऑगस्ट महिन्याच्या मुख्यसभेसाठी विचारलेल्या प्रश्‍नोत्तरातून ही बाब समोर आली.

पुरर्रोपण नक्‍की झाले का?
महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, 2012-13 ते 2019-20 या कालावधीत सुमारे 31 हजार 313 झाडे पूर्णपणे काढण्यास मान्यता दिली आहे. त्यातील 14 हजार 845 झाडे पुनर्रोपण केली आहे. तर उर्वरित 16 हजार 368 झांडांच्या मोबदल्यास संबंधितांकडून महापालिकेने एकाच तीन प्रमाणे नवीन झाडे लावून घेतली आहे. तसेच प्रत्येक झाडासाठी सुमारे 10 हजार रुपयांपर्यंत अनामत रक्‍कम भरून घेतली आहे. मात्र, ही तीन पट झाडे कुठे लावण्यात आली, त्यांचे ठिकाण काय, ती वाढली की नाहीत, याची कोणतीही माहिती वृक्षप्राधीकरण समितीकडे नाही. त्यामुळे ही झाडे कुठे लावली त्याचे पुनर्रोपण नक्‍की कुठे झाले याबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना, माहिती संकलित करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे खरचं पुनर्रोपण झाले का असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होतो.

50 टक्‍केच अनामत रक्‍कम परत
वृक्षसंवर्धन समितीकडून वृक्ष तोडण्यास परवानगी दिल्यानंतर वृक्ष पूर्णत: काढणे तसेच पुनर्रोपण करण्यासाठी प्रतीवृक्ष 10 हजार रुपये रक्‍कम अनामत म्हणून ठेवली जाते. 2 वर्षांनंतर वृक्ष पूर्ण काढलेला असल्याने त्या बदल्यात 3 वृक्ष लावलेले असल्यास त्याची 2 वर्षांनंतरची सद्यस्थिती लक्षात घेऊन तपासणी करून ही रक्‍कम संबंधितांना परत केली जाते. 2012 ते 2019-20 या 8 वर्षांत महापालिकेकडे या अनामत रकमेपोटी तब्बल 15 कोटी 69 लाख 53 हजार रुपये जमा झाले आहेत. सुमारे 16 हजार झाडांसाठीची ही रक्‍कम आहे. त्यामुळे प्रशासनाने दिलेली आकडेवारी पाहता केवळ 50 टक्‍केच झाडांसाठीची अनामत रक्‍कम परत गेली आहे. म्हणजेच जवळपास 50 टक्‍के झाडांचे पुनर्रोपण आणि नवीन बदल्यातील प्रत्येकी 3 वृक्षही लावण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जेवढी झाडे तोडली जातात, त्याच्या तीन पट झाडे लावून पर्यावरण संर्वधन केले जाते हा महापालिकेचा दावा या आकडेवारीने फोल ठरला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)