सात गावांतील हद्दीचे नकाशे जाहीर
पुणे -पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीचे अधिसूचित क्षेत्र जाहीर केल्यानंतर या क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याचा उद्देश महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) जाहीर केला आहे. त्यानुसार पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाची वाडी या गावांतील हद्दीचे नकाशे जाहीर करण्यात आले. यावर 1 हजार 229 हरकती नोंदविण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली.
महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना नियोजन कायदा 1966 च्या तरतुदीनुसार उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना विकास योजना तयार करण्याचे अधिकार देण्यात आले. त्यानुसार हद्दीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुरंदर येथे विमानतळ उभारण्यासाठी 2 हजार 832 हेक्टर जागा लागणार आहे. या 7 गावांतील विमानतळासाठी किती क्षेत्र संपादित करावे लागणार आहे. कोणत्या गावातील जमिनी यामध्ये जाणार आहे. याची सर्व्हे नंबर निहाय माहिती या नकाशांमध्ये देण्यात आली. त्यावर हरकती सूचना नोंदविण्यासाठी दि. 24 जुलै 2019 पर्यंत मुदत होती. मात्र “एमएडीसी’ने हरकती नोंदविण्यासाठी मुदतवाढ दिली असून येत्या सोमवारपर्यंत (दि.19) ही मुदत आहे. 2 हजार 832 हेक्टरपैकी 2 हजार हेक्टरवर प्रत्यक्षात विमानतळ उभारण्यात येणार आहे. विमानतळाचा मास्टर प्लान तयार करण्याचे काम यापूर्वीच कंपनीकडून डार्स या कंपनीला दिले आहे. तर उर्वरित 832 हेक्टरवर पायाभूत सुविधा उभारण्यासाठी विकास आराखडा करण्यात येणार आहे.