जिनिव्हा – करोना विषाणूच्या पूर्वी सापडलेल्या व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रॉन व्हेरिएंट अधिक घातक असणार नाही. पूर्ण लसीकरण झाल्यानंतर हा व्हेरिएंट घातक असू शकणार नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या करोना विरोधी लसी ओमायक्रॉन व्हेरिएंटवर नक्कीच परिणामकारक ठरतील, असा विश्वास जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला आहे.
नव्याने सापडलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटबद्दल सध्या फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. मात्र सध्या उपलब्ध असलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा व्हेरिएंट डेल्टा किंवा त्यापूर्वीच्या व्हेरिएंटपेक्षा अधिक घातक असणार नाही. डेल्टा किंवा अन्य व्हेरिएंटमुळे लोक जेवढे आजारी पडू शकत होते, त्यापेक्षा अधिक हानी होण्याची शक्यता नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालिन विभागाचे संचालक सिशेल रेयान यांनी म्हटले आहे.
ओमायक्रॉनबाबत अजूनही खूप संशोधन होणे बाकी आहे. ही खूपच प्राथमिक अवस्था आहे. आपल्याला खूपच काळजी घ्यावी लागणार आहे. आताच त्याबद्दल आताच अंदाज कसा काय वर्तवला जाऊ शकेल? सध्या अस्तित्वात असलेल्या लसी ओमायक्रॉनवर परिणामशून्य ठरू शकतील, अशी कोणतीही माहितीही सध्या उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे त्याबद्दलही ठामपणे सांगता येऊ शकणार नाही, असेही रेयान म्हणाले.
सध्याच्या लसी करोनाच्या व्हेरिएंटवर परिणामकारक ठरल्या आहेत. विशेषतः गंभीर आजारपण आणि रुग्णालयात दाखल केले जाण्याच्या बाबतीत तरी या लसी परिणामकारक ठरल्या आहेत. त्यामुळे या लसी नव्या व्हेरिएंटवर निष्प्रभ ठरतील, असे मानण्याचे काहीही कारण नाही, असे रेयान म्हणाले.