हडपसर -पहिल्याच पावसात हडपसर परिसरात ठिकठिकाणी पाणी साठून स्मार्ट महापालिकेचे पितळ उघडे पडले. करोडो रुपयांचे नालेसफाई, पावसाळी गटारे सफाई, रस्ते दुरुस्तीचे टेंडर काढून करोडो रुपये पाण्यात गेलेले दिसतात. हडपसर परिसरात दिवसभरात दोन ते चार वेळा हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. परंतु ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साठले होते. महेंद्र बनकर म्हणाले, स्मार्ट सिटीचा निधी, जी 20 चा निधी, पावसाळी कामांचा निधी महापालिका फक्त कागदोपत्री नाचवला की काय अशी शंका येते.
छोट्याशा पावसात एवढी दुरवस्था होत असेल तर मोठ्या पावसाने भीषण परिस्थिती उद्भवू शकते. हडपसर क्षेत्रीय कार्यालयाने त्वरित साफसफाई तसेच रस्ते दुरुस्ती म्हणजेच जिथे खड्डे असतील तर बुजवणे, पावसाळी गटारे साफ झाली नसतील तर करून घेणे. तसेच ज्या ठिकाणी पाणी पावसाळी गटारात जात नसेल तर जाण्यासाठी तशी व्यवस्था करणे. तसेच जिथे विनाकारण रस्ते खोदून ऐन पावसाळ्यात अडचणीत वाढ केली आहे, ते त्वरीत व्यवस्थित डांबरीकरण करणे. ही कामे येत्या सात दिवसांत न झाल्यास नागरिकांच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने हडपसर क्षेत्रीय कार्यालय येथे आंदोलन केले जाईल, असा इशारा महेंद्र बनकर यांनी दिला.