नगर : ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे करोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक थेट ऑक्सिजन प्लँट गाठत आहेत. तेथे ऑक्सिजन निर्माण करणार्या व्यवस्थापनासोबत त्यांची बाचाबाची होण्याच्या घटना घडू लागल्याने आता ऑक्सिजन प्लँटच्या 100 मीटर परिसरात संचारबंदी घोषित करण्यात आली आहे.
नगरचे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी तसे आदेश काढले असून, त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नगरच्या एमआयडीसी मधील अहमदनगर इंडस्ट्रियल गॅस प्लॉट, हायटेक एअर प्रॉडक्ट व श्रद्धा एअर प्रॉडक्ट तसेच नेवासे तालुक्यातील चिलेखनवाडी येथील लोचनबाई इंडस्ट्रीजच्या परिसरात ही संचारबंदी घोषित करण्यात आल्याचे आदेश प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यानंी दिले आहेत.
सद्यास्थितीत वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नगरजवळील ज्या कंपन्यांत ऑक्सिजनची निर्मिती होते. तेथे रुग्णालयांचे प्रतिनिधी यांच्यासोबत खासगी व्यक्तिही पोचत आहेत. मात्र, प्राधान्यक्रमावरुन तिथे वादाच्या घटना घडण्यास सुरुवात झाल्याने काही अनुचित घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे तातडीने तेथे कलम 144 (1) लागू करण्यात आले आहे.
नगरमधील जिल्हा शासकीय रुग्णालयातील स्टोरेज प्लँटच्या ठिकाणीही हे आदेश लागू करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणार्यांविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.