ब्रुसेल्स – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतातील आरोग्य यंत्रणांवर मोठा ताण यायला लागला आहे. तसेच ऑक्सिजन आणि रेमडेसिविरच्या पुरवठा कमी पडायला लागला आहे.भारतातील करोनाशी संबंधित स्थिती अधिकाधिक बिघडत असल्याच्या पार्श्वभुमीवर जर्मनी आणि युरोपिय संघाने भारतापुढे मदतीचा हात केला आहे.
युरोपियन संघाच्या “इमर्जन्सी रिस्पॉन्स कोऑर्डिनेशन सेंटर’च्यावतीने भारताला ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा पुरवठा करण्यासाठी सदस्य देशांबरोबर समन्वय साधला जात आहे, असे युरोपियन संघाच्या आपत्ती व्यवस्थापनासाठीचे आयुक्त जनेझ लेनेरियस म्हणाले. भारताकडून जर्मनीला लसींची निर्यात संथ गतीने होत असल्याबद्दल जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी गेल्या आठवड्यात भारतावर टीका केली होती. मात्र करोनाविरोधातील लढाईसाठी आपल्या देशाकडून सहकार्याची बांधिलकी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. आता “मिशन सपोर्ट’साठी आपला देशही तयारी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भारतात सलग चौथ्या दिवशी 3 लाखांपेक्षा अधिक बाधितांची नोंद झाली आहे. शनिवारपासून 3,19,619 जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे देशातील करोना बाधितांची एकूण संख्या 1 कोटी 70 लाखांच्यावर गेली आहे. तर करोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 1 लाख 92 हजार इतकी झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
कॅनडानेही भारताला शक्य असेल ती मदत देऊ केली आहे. या आपत्तीच्या प्रसंगी भारताला मदत देण्याचे कॅनडाने ठरवले आहे, असे शनिवारी पत्रकार परिषदेत कॅनडाच्या सार्वजनिक सेवा व खरेदी मंत्री अनिता आनंद यांनी सांगितले. “आम्ही पीपीई किट, व्हेंटिलेटर आणि भारत सरकारसाठी उपयुक्त ठरणाऱ्या कोणत्याही वस्तूंचा पुरवठा करण्यास तयार राहू.’ असे त्या म्हणाल्या. कॅनडाचे सरकार भारताशी संपर्कात आहे आणि नवी दिल्लीतील उच्चायुक्त नादिर पटेल यांच्यामार्फत आम्ही मदत करण्याच्या अनेक पर्यायांविषयी चर्चा करीत आहोत, असे भारतीय वंशाच्या अनिता आनंद म्हणाल्या.