पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – राज्यात ठिकठिकाणी मेफेड्रोन (एम.डी.) निर्मितीचे कारखाने टाकले जात आहेत. एम.डी. बनविण्याचा फॉर्म्युला सोपा असल्याने तसेच बंदी घातलेले केमिकल वेगवेगळ्या पद्धतीने मागवून ड्रग तयार करण्यात येते आहे, असे खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले.
त्या पाशर्वभूमीवर शहरातील ड्रग व्यवसायाचा आढावा घेतला असता, सांगीतिक कॉन्सर्ट, पब आणि कॅफे संस्कृती ही ड्रग व्यवसाय फोफावण्यास कारणीभूत ठरल्याचे सांगितले जाते आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश पब आणि बार राजकीय नेत्यांशी संबंधित आहेत.
मुंबईनंतर पुणे शहरात सर्वाधिक ड्रगचे सेवन, विक्री आणि वितरण होत असल्याचे गेल्या काही महिन्यांत समोर आले आहे. पुणे शहरात ड्रगचे जाळे वाढण्यामागे मोठ्या प्रमाणात असलेल्या हाय-प्रोफाइल शैक्षणिक संस्थांमधील तरुण आणि आयटीतील भरभक्कम पगार असलेली तरुण पिढी हा ग्राहक वर्ग आहे.
वीकेंडचा पब, कॉन्सर्ट आणि इन्व्हेंटच्या माध्यमातून तरुण ग्राहकांचा महापूर असतो. ड्रग विक्रेत्यांच्या दृष्टीने हा माॅब हेरला गेला आहे. त्यामुळे पेडलरचे जाळे त्या समूहात पसरलेले दिसते. तर वीकेंडला अनेकदा फुड पार्सलमधूनही ड्रग मागवणारा ग्राहकवर्ग मोठा आहे. यामुळे ही एक मोठी बाजारपेठ पुणे शहरात उपलब्ध झाली आहे.
ड्रगचे उत्पादनही आता शहराच्या आसपास कुरकुंभ, चाकण व इतर औद्योगिक परिसरत घेतले जात आहे. शहरातील पेडलरची संख्या काही हजारांमध्ये असल्याचे सूत्रांनी सांगितले. अनेकदा नशेच्या आहारी गेलेले तरुणही पेडलरचे काम करतात. तर मौजमजेसाठी सहज पैसा कमावण्यासाठीही तरुण पेडलरचे काम स्वीकारतात. आफ्रिकन देशांतील अनेक नागरिकही शिक्षण किंवा व्यवसायासाठी शहरात येऊन ड्रग विक्री करतात. मागील काही वर्षांत झालेल्या कारवायांमधून हे स्पष्टपणे दिसून आले आहे.
क्युऑक्स आणि कॅफे कल्चरला ड्रगचा वेढा –
पोलीस आयुक्तांनी पब संदर्भात जमावबंदीची ऑर्डर काढून फास आवळण्यास सुरुवात केली आहे. यामुळे ड्रग वितरकांवर परिणाम होणार आहे. मात्र, शहरात अनेक ठिकाणी क्युऑक्स आणि कॅॅफे रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. अनेकदा गल्लीबोळात किंवा एखाद्या बंगल्यात, रुफ टॉफ रेस्टॉरंट आणि मॉलमध्ये हा व्यवसाय सुरू असतो.
घोले रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, विमाननगर एनआयबीएम रस्ता येथे हे प्रमाण जास्त आहे. तेथे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. आता ड्रगचे पेडलर तेथे डिलिव्हरीला प्राधान्य देत आहेत. यामुळे केवळ पबवर नियमांचे बोट न ठेवता. क्युऑक्स आणि कॅफे कल्चरलाही आळा घालणे आवश्यक आहे.
शहरात ड्रगची विक्री सांगीतिक कॉन्सर्ट, पब तसेच धुलिवंदन आणि होळीसारख्या सणांच्या इव्हेंट कार्यक्रमात केली जाते. यामुळे केवळ पबवर कारवाई न करता, या इतर गोष्टींकडेही पोलिसांनी लक्ष देणे आवश्यक आहे. तरच पुणे ड्रग फ्री होऊ शकते. अजय दुधाणे, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र
एआरआयच्या टेकडीवरील प्रसंग…
शहरात अगदी पान टपरीवरही ड्रग, गांजा, चरस उफलब्ध होत आहे. तरुण- तरुणी शिक्षणानिमित्त पुण्यात आल्यावर अशा व्यसनांच्या आहारी जातात, असे मत दिग्दर्शक व कलाकार रमेश परदेशी (पिट्या भाई) यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. ते एआरआयच्या टेकडीवर सकाळी फिरायला गेले असता, तेथे दोन तरुणी नशेच्या अंमलाखाली आढळल्या होत्या. यानंतर त्यांनी लाइव्ह करत ही माहिती पुणेकरांनी दिली.