पुणे -सीए परीक्षेनंतर आता कंपनी सेक्रेटरी अर्थात सीएस परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सीएसची जूनमध्ये होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. या परीक्षा ऑगस्ट महिन्यात होणार असल्याचे इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाकडून (आयसीएसआय) स्पष्ट करण्यात आले आहे.
सीएस फाऊंडेशन प्रोग्रामची परीक्षा 13 आणि 14 ऑगस्ट रोजी होणार आहे. एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल प्रोग्राम्ससाठी सीएस परीक्षा 10 ते 20 ऑगस्टला होणार आहे.
आयसीएसआय फाऊंडेशन परीक्षा सकाळी आणि दुपारी दोन शिफ्टमध्ये होणार आहेत. प्रोफेशनल आणि एग्झिक्युटिव्ह प्रोग्राम्ससाठी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. याआधी जुन्या व नव्या अभ्यासक्रमानुसार फाऊंडेशन प्रोग्राम, एग्झिक्युटिव्ह प्रोग्राम आणि प्रोफेशनल प्रोग्रामची परीक्षा 1 ते 10 जूनपर्यंत होणार होती. पण आता या परीक्षा ऑगस्ट महिन्यात होणार आहेत.