पुणे – करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. तसेच रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. निर्बंध शिथिल झाल्याने व्यापारासह सर्व आस्थापना सुरू झाल्या आहेत. आता अनेक महिन्यांपासून बंद असलेले न्यायालयाचे कामकाजही पूर्ण क्षमतेने सुरू व्हावे.
जेणेकरून दिवाणी, फौजदारी दाव्यात सुनावणी होईल. पक्षकारांना न्याय मिळेल, अशा प्रतिक्रिया कायदे तज्ज्ञांनी दैनिक “प्रभात’कडे व्यक्त केल्या. याबरोबरच करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यास तयार आहोत. तसेच, पक्षकारांनीही ते केले पाहिजे, असे आवाहनही वकिलांनी केले.
शहरातील सगळ्या आस्थापना सुरू होत आहेत. न्यायालयातील कामे प्रलंबित आहेत. न्यायालय पूर्ण क्षमतेने सुरू झाले पाहिजे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश नीरज धोटे यांच्यासोबत मिटींग झाली आहे. यामध्ये पूर्ण क्षमतेने न्यायालय सुरू करण्याची मागणी केली आहे. याबाबत उच्च न्यायालयाला कळवावे, असे पुणे बार असोसिएशनने म्हटले आहे. उच्च न्यायालयाकडूनही यावर लवकर निर्णय होवून न्यायालयाचे कामकाज सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
– ऍड. सतीश मुळीक, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन
सुमारे दोन वर्षांपासून न्यायालय बंद आहे. कामे ठप्प झाली आहेत. करोना परिस्थितीताचा विचार करता काळजी घेऊन न्यायालयाचे कामकाज सुरू झाले पाहिजे. सगळी गर्दी एकदाच होऊ नये, यासाठी कामाच्या वेळेचे नियोजन झाले पाहिजे. सुनावणी कोणत्या वेळेत होणार, रिमांड, अर्जंट कामकाज कोणत्या वेळेत चालणार याची विभागणीही केली पाहिजे. जेणेकरून त्यांना हव्या असलेल्या वेळेला पक्षकार न्यायालयात येतील. परिणामी, गर्दी होणार नाही.
– ऍड. प्रताप परदेशी, ज्येष्ठ विधिज्ञ