लोणावळा- लोणावळा शहरात रविवारच्या सुट्टीनिमित्त मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गासह लायन्स पॉईट परिसर, खंडाळा, कार्ला लेणी मार्ग, मळवली रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली होती.
गेल्या आठवड्यापासून लोणावळा परिसरातील गड-किल्ले व लेण्या पर्यटकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. तसेच लायन्स पॉईंटकडे जाणाऱ्या मार्गावरील “चेकपोस्ट’ नाका देखील बंद करण्यात आले आहेत. लोणावळ्यातील पर्यटनस्थळे अद्यापही बंद ठेवण्यात आली असली तरीही याठिकाणी जाणारे मार्ग खुले करण्यात आल्याने पर्यटकांनी मोठ्या संख्येने लोणावळ्यात गर्दी केली. यातच रविवारी दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पर्यटकांमध्ये आनंदाची लहर उसळली, असे चित्र दिसून आले.
मागील अनेक महिन्यांपासून शहरातील पर्यटन बंद असल्याने येथील व्यावसायिकांवर संकट कोसळले होतं. मात्र सरकारने हळूहळू सर्वच क्षेत्रावरील बंदी उठवायला सुरुवात केल्याने या आठवड्यात शनिवारपासून पर्यटक संख्या वाढू लागल्याने स्थानिक व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कॉंग्रेस आज पुणे-मुंबई महामार्ग रोखणार
लोणावळा : केंद्र सरकारने शेतकरी विरोधी असलेले तीन कायदे मागे घ्यावे तसेच तरूणांमध्ये वाढती बेरोजगारी आणि पेट्रोल, डिझेल, गॅसचे वाढते दर या विषयावर केंद्र सरकारला घेरण्यासाठी राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाकडून सोमवारी (दि. 27) “भारत बंद’ची घोषणा केली आहे. त्याला अनुसरून लोणावळा शहर कॉंग्रेसच्या वतीने लोणावळा शहरात “बंद’चे आवाहन केले असून, राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. याची माहिती देण्यासाठी लोणावळा शहर कॉंग्रेस ब्लॉकच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.