गाझियाबाद: लॉकडाऊन वाढल्याने घरी परतण्यासाठी मजुरांची धडपड सुरू आहे. त्यातच उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये आज (18 मे) सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: बोजवारा उडाला. श्रमिक ट्रेनसाठी नोंदणी करण्यासाठी हजारोंच्या संख्येने मजूर रामलीला मैदानात जमा झाल्याने एकच गोंधळ उडाला.
श्रमिक ट्रेनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रशासनाने मजुरांना थर्मल स्क्रीनिंग आणि कागदपत्रांच्या पडताळणीसाठी थांबवले होते. पण घटनास्थळी हजारोंच्या संख्येने मजूर गोळा झाले. परिणामी स्थानिक यंत्रणांवर ताण आला. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम इथे अर्थहीन ठरले. काऊंटरवर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही मजुरांना पोलिसांनी पांगवले.
गाझियाबादच्या घंटाघरजवळ असलेल्या रामलीला मैदानात मजुरांनी तुफान गर्दी केली. या ठिकाणी मजुरांसाठी कम्युनिटी सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे; परंतु मजुरांची संख्याच प्रमाणापेक्षा जास्त झाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
गाझियाबादच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, “बिहारसाठी गाझियाबादहून तीन ट्रेन सोडल्या जाणार आहेत. प्रत्येक ट्रेनमधून 1200 मजुरांना बिहारला नेले जाईल. आज सुमारे 3600 मजुरांना बिहारला पाठवले जाईल. याशिवाय लखनौ, गोरखपूरच्या मजुरांनाही इथूनच रवाना केले जाईल. सकाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणात होती, पण त्यानंतर थोडा तणाव निर्माण झाला. त्यावर नियंत्रण मिळवण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
दुसरीकडे आम्ही बराच वेळ उन्हात उभे आहोत. त्यामुळे फार अडचणी येत आहेत. आम्ही कालही आलो होतो, पण नंबर आला नाही, अशी व्यथा मजुरांनी मांडली.