पालघर: लॉकडाऊमुळ दारुची दुकाने बंद असल्यामुळे दारुच्या छुप्या पद्धतीने दारु आणण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या जात आहेत. कधी अत्यावश्यक सेवेच्या वाहनातून तर कधी ऍम्बुलन्समधून दारूची वाहतूक केली जात आहे. आता तर थेट बेस्ट बसमधून दारुची वाहतूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. नालासोपारा पूर्वेला मुंबईच्या बेस्ट बसमधून 30 हजार रुपयांची देशी विदेशी दारु पकडली आहे. एका आठवड्यात ही दुसरी घटना आहे.
नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलिसांनी बेस्ट बसची तपासणी केली असता बस ड्रायव्हरच्या केबिनमध्ये आणि बसच्या शेवटच्या सीट खाली दारु आढळून आली. देशी विदेशी दारुच्या एकूण 327 बाटल्या आढळून आल्या. याची किंमत 30 हजार 550 एवढी आहे. तर बसची किंमत पकडून 12 लाख 30 हजार 550 रुपये एवढा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
याप्रकरणी बेस्ट बसचा चालक निजाम होडकर याच्यासह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई परिसरात सध्या दारु विक्रीला मनाई आहे. त्यामुळे मुंबईतील काही टोळी आपल्या माणसांकरवी वसई-विरार परिसरातील दुकानांतून दारु विकत घेवून ती मुंबईत तिप्पट दराने विकत असल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी एका रुग्णवाहिकेमधून विदेशी दारु पोलिसांनी पकडली होती.