सातारा – मकर संक्रातीच्या खरेदीसाठी सातारा शहरातील बाजारपेठ गर्दीने फुलून गेली आहे. सुगडी, भोगीच्या साहित्यासह हलव्याचे दागिने खरेदीसाठी राजवाडा व खण आळी परिसरात प्रचंड गर्दी झाली होती.
इंग्रजी नववर्षाच्या सुरवातीला येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. यंदा किंक्रांत 14 रोजी तर संक्रात 15 जानेवारी रोजी होत आहे.
या सणाच्या दिवशी घरात आलेल्या सुनेला, जावयाला, नवजात बालकाला हलव्याचे दागिने घातले जातात. त्यांचे स्वागत केले जाते. यानिमित्ताने बाजारात आकर्षक कागदी फुलांनी सजवलेले काटेरी हलव्याचे दागिने आले आहेत. नववधूसाठी आलेला गौरी सेट, शाही हार, मिनी सेट महिलांच्या पसंतीस पडत आहे, तर जावयासाठी यंदा काटेरी हलव्यात मोबाइल सेट बाजारात आला आहे.
या दागिन्यांचा ट्रेण्ड बदलत असून दागिन्यांच्या विविध प्रकारांनी यात जागा घेतली आहे. पूर्वी फक्त मोजकेच दागिने असत. जसजशी नवीन फॅशन येत आहे, तसे नाविन्यपूर्ण दागिने पाहायला मिळत आहेत. शाही हाराची किंमत 350 रुपये आहे, गौरी सेटमध्ये बांगड्या, मंगळसूत्र, झुमके, अंगठी, नथ या दागिन्यांचा समावेश आहे. हा सेट 300 रुपयांना मिळत आहे.
ज्यांना जास्त दागिने घालायला आवडत नाही, त्या नवविवाहित महिला या सेटला पसंती देत असल्याचे विक्रेत्या दर्शना घोरपडे यांनी सांगितले. मेखला 350 रुपयांना आहे. नेकलेस, बिंदी, झुमके, कानवेल, नथ, बाजूबंद, बांगड्या, मंगळसूत्र, अंगठी या दागिन्यांचा मिनी सेट 500 रुपयांना मिळत आहे. नेकलेस, बिंदी, झुमके, कानवेल, नथ, बाजूबंद, बांगड्या, मंगळसूत्र, अंगठी, कमरपट्टा, मुकुट, चिंचपेटी या दागिन्यांचा पूर्ण सेट 900 रुपयांना उपलब्ध आहे. ज्यांचे पॅटर्न वेगळे, त्यांचे दर 700 ते 900 रुपयांदरम्यान आहेत. साडीची पिन, बिंदिया, गजरादेखील काटेरी हलव्यात पाहयला मिळत आहे. लहान मुलींसाठी राधा सेट उपलब्ध आहे.
या सेटमध्ये दोन बाजूबंद, मुकुट, कानांतले, अंगठी, हार, गुलाबाचे फुल, तर दुसऱ्या सेटमध्ये हेअर बॅण्ड, पायल, हार, बाजूबंद, बांगडी, कमरपट्टा हे दागिने आहेत. याचे दर 200 ते 250 रुपयांच्या आसपास आहे. लहान मुलांसाठी कृष्णा सेट उपलब्ध असून त्यात मुकुट, मोरपीस, मनगट्या, बाजूबंद, हार, बासरी असे पॅटर्न असून याचे दर 100 ते 200 रुपये आहे. यंदा काटेरी हलव्याचे दागिने बनविणारे कारागीर वाढल्याने दर कमी झाले असल्याची माहिती दर्शना घोरपडे यांनी दिली. जावयासाठी हार, नारळ बाजारात आले असून मोबाइलचा एक आगळावेगळा सेट पाहायला मिळत आहे. या सेटमध्ये मोबाइलबरोबर अंगठी, पेन, घड्याळाचा समावेश आहे. त्याचा दर 250 रुपये आहे.
हलव्याच्या दागिन्यांना ग्राहकांमधून मागणी भोगीचा बाजार खरेदीसाठी सोमवारी सातारा शहरातील बाजारात तोबा गर्दी झाली होती. शहरातील सर्व भाजी मंडईंमध्ये मोठ्या प्रमाणात भाज्या उपलब्ध होत्या. मंगळवारी दि. 13 जानेवारी रोजी होणाऱ्या भोगीसाठी शहरातील भाजी मंडईत हरभरा, वाटाणा, वांगी, कांद्याची पात, गाजर, मेथी आदी भाज्यांची हजेरी लागली होती. रात्री उशिरापर्यंत शहरातील भाजी मंडईत गर्दी होती. यासह संक्रांत सणाच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसून आली. मंडईत बाजरी, राळ्याचे तांदूळ, गाजर, वाटाणा, वांगी, हरभरा, पातीचा कांदा यासह अन्य भाज्यांची विक्रीसाठी आल्या होत्या. बाजरीचे तयार पीठही विक्रीसाठी उपलब्ध होते.
सातारा शहरातील भवानी पेठ भाजी मार्केट, राजवाडा, गोलबाग, देवी चौक, सदाशिव पेठ व पोवई नाका भाजी मंडईमध्ये सायंकाळपर्यंत खरेदीसाठी गर्दी होती. संक्रांतीसाठी तिळगुळाच्या हलव्यासह विविध वस्तूंनी बाजारपेठ फुलली आहे. तिळगूळ, रेवडी, चिक्की, तिळाचे लाडू रस्तोरस्ती विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. मोठमोठ्या शोरूममधून सजलेले काळ्या रंगातील कपडे, साड्यांनी संक्रांतीचे वातावरण निर्माण केले आहे.
संक्रांतीदिवशी सुवासिनी सुगडामध्ये या हंगामात येणारे धान्य, भाज्या उसाचे तुकडे, गूळ, तीळ घालून संक्रांतीची पूजा करतात. सुवासिनींना हळदी कुंकवासह वाण देतात. त्यामुळे महिलांसाठी हा सण विशेष आनंदाचा असतो. घरोघरी तिळगूळ तसेच हलवा, तिळाचे लाडू केले जातात. घराघरांत संक्रांतीचा हलवा बनवण्याची घाई सुरू झाली आहे. बाजारात संक्रांतीचे सुगड खरेदीसाठीही महिलांची गर्दी झालेली
दिसून आली.