शिरूर – खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शिरुर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. खरिपासाठी लागणाऱ्या बाजरी, मूग, तूर, भुईमूग व वाटाणा पिकांच्या बियाणे व खते खरेदीसाठी शिरुर येथील कृषि सेवा केंद्रासमोर गर्दी केली होती. त्यामुळे गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी काही दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर अडथळे लावले आहेत. हात धुण्यासाठी सॅनिटायझरची सोय केली आहे.
शेतकऱ्यांची बाजारात बियाणे, औषधे व खते खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. पूर्व व मध्य भागांत दमदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागती व तर बहुतांश ठिकाणी पेरणी सुरु केल्या आहेत.
लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना उधारीवर बियाणे, खते व औषधे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. सरदवाडी, गोलेगाव, तर्डोबावाडी, रामलिंग, अण्णापूर परिसरातील बैलांच्या सहाय्याने तर बहुतांश ठिकाणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाजरी व मुगाच्या पेरणीला सुरुवात केली आहे.