कराड -सातारा जिल्ह्यातील करोनाग्रस्त रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलमधून शनिवारी दि. 20 रोजी करोनामुक्त झालेल्या आठ रुग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधील योग्य उपचाराने तब्बल 206 रूग्णांना करोनामुक्त झाले आहेत. कृष्णा हॉस्पिटलने करोनामुक्तीचे द्विशतक पार केले आहे.
जिल्ह्यात करोनाने हाहाकार निर्माण केला. पहिल्या टप्प्यातच सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात सर्वाधिक करोना रुग्ण आढळून आले. त्यातही कराडमध्ये करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलच्या करोना विशेष कक्षाची निर्मिती करून करोना रूग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचारास प्रारंभ झाला.
कराड तालुक्यातील पहिल्या असणाऱ्या तांबवे येथील करोनामुक्त रूग्णाला दि. 18 एप्रिल रोजी टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर कृष्णा हॉस्पिटलने यशस्वी उपचाराने करोनामुक्त झालेल्या रूग्णांना, सन्मानपूर्वक डिस्चार्ज देण्याची मालिकाच सुरू
केल्याने लोकांमधील करोनाबद्दलची भीती कमी होण्यास मदत झाली आहे. शनिवारी दि. 20 रोजी 206 व्या करोनामुक्त रूग्णाला कराडचे पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन कृष्णा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, वित्त अधिकारी पी. डी. जॉन, परीक्षा नियंत्रक डॉ. रजनी गावकर, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. प्रणिता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, शनिवारी डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये कराड तालुक्यातील केसे येथील 20 वर्षीय युवक, 50 वर्षीय महिला, 43 वर्षीय महिला, 20 वर्षीय युवती, 60 वर्षीय महिला, तुळसण येथील 40 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, शिंदेवाडी-विंग येथील 42 वर्षीय महिला अशा एकूण आठ जणांचा समावेश आहे.