‘ताडी’विरोध करणाऱ्या कार्यकर्त्याच्या अंत्ययात्रेत हजारोंची गर्दी; करोना नियमांना हरताळ

सोलापूर – ताडी विरोधात आवाज उठविणारा आणि ताडीला थोपविणारा अशी ओळख निर्माण करणारा सामाजिक युवा कार्यकर्ता करण म्हेत्रे (वय 40) यांच्या अंत्ययात्रेला रविवारी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. 

या गर्दीमुळे करोना प्रतिबंधक नियमांना हरताळ फासला जात आहे, हे पाहणारे पोलीस प्रशासन मात्र या गर्दीसमोर हतबल झाले होते. करण म्हेत्रे यांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, याच आजारात त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले. हे समजताच हजारो कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी केली होती. 

करण यांच्या पत्नी अनिता म्हेत्रे या कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका आहेत. करण यांनी मोची समाजातील तरुण तंदुरुस्त असावा म्हणून अनेकांना व्यवसानापासून दूर केले होते. ताडीसारख्या विषाला दूर ठेवण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले होते.

करण म्हेत्रे यांचे निधन झाल्याचे वृत्त पसरताच पोलिसांनी तत्काळ हॉस्पिटलबाहेरील गर्दी कमी करण्यासाठी पोलीस बंदोबस्त लावला होता. मात्र, तरीसुद्धा कार्यकर्त्यांची गर्दी रात्रभर हटलेली नव्हती. अंत्ययात्रेला मोठी गर्दी होणार हे लक्षात आल्यावरही पोलिसांनी कोणतीच काळजी घेतली नाही.

सोलापुरात करोनाच्या पार्श्‍वभूमीवर अंत्यसंस्कारासाठी केवळ 20 जणांना परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र, म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेत हतबल झालेल्या पोलिसांना केवळ बघ्याचीच भूमिका घ्यावी लागली. पोलिसांनी गर्दीसंदर्भात गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. मात्र, नेमका कोणावर आणि किती जणांवर गुन्हा दाखल करणार हे मात्र सांगितलेले नाही.

जन्माच्या स्वागताप्रमाणे मृत्यूनंतरसुद्धा आनंदाने निरोप
मोची समाजामध्ये जन्माचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जाते, तर मृत्यूनंतरसुद्धा आनंदाने निरोप देण्याची प्रथा आहे. समाजामध्ये अनेक वर्षांपासून ही प्रथा आहे. करण म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेतसुद्धा कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष करत व करण यांचे डिजिटल फ्लेक्‍स फडकावत त्यांना आनंदाने निरोप दिल्याचे दिसून आले. अनेक कार्यकर्ते घोषणाबाजी व जल्लोष करताना दिसून आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.