यान्गोन, दि. 16 – म्यानमारमधील लष्करी बंडाला सर्वाधिक तीव्र विरोध केला जाणाऱ्या जिल्ह्यामध्ये म्यानमारच्या संसदेने मार्शल लॉ लागू केला आहे. या मार्शल लॉ अंतर्गत सरकारी सुरक्षा दलांनी पश्चिमेकडील चिरी प्रांतात सशस्त्र हल्ले करायला सुरुवात केली आहे. यामुळे अमेरिका आणि ब्रिटनच्या म्यानमारमधील दूतावासांनी चिंता व्यक्त केली आहे.
चिरी प्रांतात सरकारी फौजांनी शनिवारी सकाळी 6 वाजता हल्ला केला. या भागातील मिंदात शहराच्या पश्चिमेकडील भागात हवाई हल्ले केले गेले. त्यामुळे काही घरांचे नुकसान झाले, असे या भागातील सशस्त्र बंडखोर गटाच्या प्रवक्त्याने सांगितले. चिनलॅन्ड डिफेन्स फोर्स असे या बंडखोर गटाचे नाव असून, फेब्रुवारीमध्ये लष्कराने केलेल्या बंडाला हा गट विरोध करत आहे. हेलिकॉप्टरनेही या हल्ल्यात भाग घेतला, असे सुरक्षेच्या कारणास्तव नाव न सांगण्याच्या अटीवर बोलणाऱ्या या प्रवक्त्याने सांगितले.
मिंदात शहराला आता वेढा पडला आहे आणि सरकारी सैन्याने हवेतून मारा करायला सुरुवात केली आहे, असे चीन मानवाधिकार हक्क संघटनेने म्हटले आहे. सरकारी फौजांचे हल्ले असेच सुरू राहिले तर मिंदातमध्ये 24 तासांतच युद्ध सुरू होईल आणि त्यामुळे हजारो नागरिकांना विस्थापित व्हावे लागेल, असा इशारा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी स्थापन केलेले “नॅशनल युनिटी गव्हर्न्मेंट’ने दिला आहे. जवळपास 50,000 लोकांच्या या शहरातून यापूर्वीच अनेकांनी पळ काढला आहे, असे एका रहिवाशाने फोनद्वारे सांगितले.
जवळपास 15 तरुणांना सरकारी सैनिकांनी ताब्यात घेतले आणि मानवी ढाल म्हणून त्यांचा वापर केला असल्याचे मिंदात टाउनशिप पीपल्स ऍडमिनिस्ट्रेशन या आणखी एका विरोधी पक्षाने दावा केला आहे. शहरातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे आणि अन्य 10 जण जखमी झाले आहेत.