लंडन – भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात 1919 मध्ये अमृतसरमधील जालियनवाला बागेत झालेल्या अमानुष हत्याकांडाचा सूड घेण्याची धमकी एका व्यक्तीने दिल्यामुळे खळबळ माजली आहे. या बुरखाधारी व्यक्तीने महाराणी एलिझाबेथ यांची हत्या करण्याचा धमकी देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओची दखल स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडून तातडीने घेण्यात आली आणि या बुरखाधारी व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.
दोनच दिवसांपूर्वी विंडसर राजवाड्यामध्ये एक सशस्त्र घुसखोर घुसल्याचे उघड झाले होते. त्या पार्श्वभुमीवर हा नवीन व्हिडीओ देखील पुढे आल्यामुळे राजघराण्याला धोक निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
स्नॅपशॉट या सोशल नेटवर्किंग साईटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये पूर्ण चेहऱ्यावर मास्क घातलेला हा व्यक्ती स्वतःला जसवंत सिंग चैल असल्याचे सांगून आपण स्वतः भारतीय शीख असल्याचे सांगताना दिसतो आहे. 1919 साली झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा सूड घेण्यासाठी राजघराण्याची हत्या करणार असल्याचे त्याने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
“मला माफ करा. मी जे केले त्याबद्दल आणि मी जे करणार आहे त्याबद्दलही मला माफ करा. मी महाराणी एलिझाबेथ यांच्या हत्येचा प्रयत्न करणार आहे.’ असे या बुरखाधारी व्यक्तीने म्हटले आहे. जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी तसेच वांशिक भेदाने अपमान केल्याचा बदला म्हणून आपण ही हत्या करणार असल्याचे या व्यक्तीने म्हटले आहे. या व्यक्तीने हातात चमकदार शस्त्र धरले असल्याचेही दिसते आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीचे आंदोलन सुरू असताना बैसाखीच्या दिवशी अमृतसरमधील जालियनवाला बागेत जनरल डायरने केलेल्या अमानुष गोळीबारात शेकडो निरपराध लोक मारले गेले होते.
दोन दिवसांपूर्वी विंडसर राजवाड्यात घुसलेल्या 19 वर्षीय युवकाचे नाव मेट्रोपोलिटन पोलिसांकडून अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. हा युवक मानसिक रुग्ण असल्याचे आता लक्षात येते आहे. त्याला मानसिक आरोग्य विभागाच्या तज्ञांच्या ताब्यात देण्यात आले आहे.