लंडन – ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यविधीसाठी रशिया, बेलारूस आणि म्यानमारला निमंत्रण देण्यात आलेले नाही. या अंत्यविधीच्या शाही कार्यक्रमासाठी जगभरातील 500 पेक्षा अधिक महत्त्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. येत्या सोमवारी वेस्टमिन्स्टर ऍब्बे येथे महाराणींच्या पार्थिवाचा दफनविधी होणार आहे.
या उपस्थितांमध्ये अनेक देशांचे प्रमुख नेते, आंतरराष्ट्रीय संस्था, संघटनांचे प्रमुख, तसेच अनेक देशांच्या राजघराण्यांच्या प्रमुखांचा समावेश असणार आहे. मात्र, रशिया, बेलारूस आणि म्यानमारला या कार्यक्रमासाठी प्रतिनिधी पाठवण्याचे निमंत्रण देण्यात येणार नाही, असे ब्रिटनमधील माध्यमांनी म्हटले आहे.
रशियाने युक्रेनविरोधात युद्ध छेडले आहे. तर बेलारूसने या युद्धात रशियाला मदत केली आहे. त्यामुळे या दोन्ही देशांना शाही समारंभातून वगळण्यात येणार आहे. म्यानमारमधील सध्याच्या लष्करी शासनानेही रशियाच्या कारवाईचे समर्थन केले होते. त्यामुळे म्यानमारलाही या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात येणार नाही. म्यानमारमध्ये झालेल्या लष्करी उठावानंतर आंग सान स्यू की यांच्या नेतृत्वाखालील सरकार बरखास्त करण्यात आले.
या उठावाचा निषेध म्हणून ब्रिटनने म्यानमारबरोबरचे संबंध तोडून टाकले आहेत. ज्या देशांबरोबर ब्रिटनचे संबंध सध्या ताणलेले आहेत, अशा देशांपैकी केवळ इराणला या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. ब्रिटनच्या परराष्ट्र धोरणानुसार हा एक मुत्सद्देगिरीचा भाग असू शकतो, असे आंतरराष्ट्रीय संबंधांच्या विश्लेषकांचे म्हणणे आहे.