सातारा – कास महोत्सव शासकीय आहे. पर्यटनवाढीसाठी शासन प्रयत्न करत आहे, त्यांनी या संकल्पनेला सहकार्य केले तर ते अध्यक्षस्थानी असते जर काही चांगले होत असेल तर यांना फक्त पैसा सुचतो. मग कास महोत्सव ही संकल्पना विरोध करणाऱ्यांना का सुचली नाही, असा उपरोधिक टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव न घेता लगाविला.
कास पठारावरील आयोजित कास महोत्सवाचे उदघाटन झाले. त्यावेळी कार्यक्रमानंतर प्रतिक्रिया देताना उदयनराजे यांनी टोलेबाजी केली. उदयनराजे म्हणाले, “”त्यांचे माझ्यावर भरपूर प्रेम आहे. त्यामुळे माझं नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवसही जात नाही. मी माझा इतका प्रचार करत नाही तितका ते माझा प्रचार करतात. अशा प्रकारचा महोत्सव माहिती नाही त्यांच्यापर्यंत या महोत्सवाचा प्रसार होईल. त्यावेळी लोक मोठ्या प्रमाणात येतील. आता तर प्रत्येक शनिवार, रविवारी पाचगणी महाबळेश्वरला राहायला जागा मिळत नाही. तसाच हा कास परिसर आहे. या महोत्सवासाठी मी पुढाकार घेतला आहे.” अशी कल्पना टीका करणाऱ्यांना का सुचली नाही, असा प्रश्न करून उदयनराजे म्हणाले, “”आमदारांनीही यायला हवे होते. अध्यक्ष म्हणून त्यांचे नाव घेतलं असतं. त्यांच्या मनात कुठून असा विचार आला, कशासाठी आला. जिल्हा प्रशासन ज्यावेळी महोत्सवासाठी निधी खर्च करते तो कार्यक्रम शासकीयच आहे. या परिसराचा विकास व्हावा, निधी उपलब्ध व्हावा, म्हणून आम्ही सर्व करत आहोत. पण ते या सगळ्यांवर टीका करत आहेत. झाडे तोडली त्यांची चौकशी करा. जे टीका करतात त्यांच्याच कार्यकर्त्यांची हॉटेल्स आहेत.”
कास महोत्सवानिमित्त संदेश देताना उदयनराजे म्हणाले, आपल्याला जिवंत राहायचे असेल तर झाडे लावा, झाडे जगवा. ज्या दिवशी झाडे संपतील त्यादिवशी आपले जीवन संपणार आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावे.