पुणे, दि. 7 -महापालिकेकडून शनिवार पेठेतील वर्तक बाग येथील जागा फटाका स्टॉलसाठी भाड्याने देण्यासाठी करण्यात आलेल्या लिलावात “वादाचे फटाके’ उडाल्याचे पहायला मिळाले. त्या पेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे यावेळी चित्रपटाप्रमाणे दादागिरी करून बोली लावू न देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाद आणि हाणामारी होण्याची शक्यता असतानाही, पालिका प्रशासनाकडून जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करण्यात आले. लिलावात वाद सुरू होताच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तसेच सुरक्षा रक्षकांनीही काढता पाय घेतला. तेथे उपस्थितांनी मध्यस्थी केल्याने हा वाद टळला.
महापालिकेकडून दिवाळीसाठी वर्तक उद्यान येथे 35 स्टॉलसाठी लिलाव प्रक्रीया ठेवली होती. यासाठी मालमत्ता व्यवस्थापन विभागाने अर्ज मागविले होते. 66 अर्ज आल्याने आरोग्य विभागा जवळील तिसऱ्या मजल्यावरील वडके हॉलमध्ये प्रकीया झाली. जो ज्यादा भाडे देईल, त्यांना स्टॉल दिले जाणार होते. व्यावसायिकांनी बोली लावण्यास सुरवात केल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित काही जणांनी इतर व्यावसायिकांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावरून सभागृहाच्या बाहेर व्यावसायिकांमध्ये जोरदार वादावादी झाली. आरोग्य विभागात अधिकार, महिला कर्मचारी काम करत असताना अर्वाच्य शिवीगाळ सुरू झाली. सर्वजण घाबरून गेले. हा वाद सुरू असताना महापालिकेचे सुरक्षा रक्षक मात्र गायब झाले होते. हा वाद मारामारीपर्यंत जाईल, अशी स्थिती आणि गोंधळ झाला होता. दरम्यान, व्यावसायिकांमधील वाद सभागृहाच्या बाहेर झाला आहे, असा दावा महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख राजेंद्र मुठे यांनी केला आहे.
ऑनलाइन लिलाव का नाही?
महापालिकेकडून शहरात वेगवेगळ्या सणांसाठी दिल्या जाणाऱ्या जागांवरून दमदाटी करणे, जागा एकानेच घेऊन त्या इतरांना भाडेतत्वावर देणे, साखळी करून जागा मिळविणे, असे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे, जागा देण्याची प्रक्रीया वादावादी न होता सुरळीत पार पाडण्यासाठी ऑनलाइन लिलाव करणे अपेक्षित असताना फटाके स्टॉलसाठी महापालिकेकडून जाहीर लिलाव बोलविण्यात आला. मात्र, त्यात वादावादी झाल्याने महापालिकेच्या धोरणावरच शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.