मुलतान – पाकिस्तानमध्ये पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाच्या सरकारविरोधात 11 पक्षांच्या “पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंट’ आघाडीने मुलतानमध्ये केलेल्या भव्य रॅलीनंतर सरकारने या आघाडीच्या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करायल सुरुवात केली आहे.
माजी पंतप्रधान युसुफ रजा गिलानी यांच्या तीन मुलांविरोधात सरकारने करोना संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचा भंग आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याच गुन्हा दाखल केला आहे. गिलानी यांचे पुत्र अली मुसा गिलानी, अब्दुल कादिर गिलानी आणि अली हैदर गिलानी यांच्यासह अन्य 48 नेत्यांविरोधात सरकरने गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आहे.
या अन्य नेत्यांमध्ये जमाईत उलेमा ए इस्लाम संघटनेच्या अली हैदर कानजो, बिलाल भट, अयाझ उल हक कासमी यांचाही समावेश आहे. मुलतान येथे 30 नोव्हेंबर रोजी झालेली रॅली ही “पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंट’ च्यावतीने सरकारविरोधात देशभरात करण्यात आलेले पाचवे मोठे शक्तिप्रदर्शन होते.
या रॅलीदरम्यान पीएमएल-एनच्या नेत्यांनी काही आतषबाजी केली होती. यामुळे एक कार्डबोर्डचे गोदाम पेटले. त्यामुळे पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गटाचे नेते एमपीए शाहिद यांच्याविरोधात एक स्वतंत्र गुन्हा दाखल केला गेला आहे.
याशिवाय या रॅलीच्या वाटेत उभे केलेले अडथळे पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तोडून टाकले होते. म्हणून त्यांच्यावरही स्वतंत्र गुन्हे दाखल केले गेले आहेत. करोनाच्या मार्गदर्शक सूचनांचा भंग केल्याबद्दल “पीडीएम’च्या तब्बल 3 हजार कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल कर्ण्यत आला आहे.