वॉशिंग्टन – डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या कारकिर्दीदरम्यान चीन विरोधात लावलेले निर्बंध मागे घेतले जाणार नाहीत, असे अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे. चीन आणि अमेरिकेमधील संबंध हाडवैराचे बनले आहेत. दोन्ही देशांकडून एकमेकांविरोधात पुन्हा पुन्हा निर्बंध लादले गेले आहेत. गेल्या चार वर्षांच्या काळत ट्रम्प यांनी चिनी वस्तूंच्या अयातीवर अब्जावधी डॉलरचे आयात शुल्क लादले आहे.
चीनबाबतच्या धोरणाबाबत बायडेन यांनी कोणताही मोठा बदल होण्याचे संकेत दिले नसले तरी चीनच्या मानवाधिकार विषयीच्या धोरणांवर बायडेन यांनी कडाडून टीका केली आहे. चीनसंदर्भात अशा मानवाधिकार उल्लंघनाच्या तक्रारींवर बायडेन यांचे बारीक लक्ष असेल. बायडेन यांनी अमेरिकेतील आघाडीच्या प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान आपल्या धोरणाबद्दल स्पष्ट कल्पना दिली.
“चीनबाबत कोणतीही कृती पूर्वग्रहाने केली जाणार नाही. कोणताही निर्णय तातडीने मागे घेण्याची घोषणा केली जाणार नाही. विशेषतः आर्थिक विषयासंदर्भात कोणत्याही निर्णयाची घाई केली जाणार नाही, असे बायडेन यांनी या मुलाखतीदरम्यान सांगितले.
आपल्या भावी सरकारचे व्यापार विषयक धोरण हे अमेरिकेला आशिया, युरोपासह मित्र देशंबरोबरची भागीदारी कायम राखण्यास पोषक असेल, असेही बायडेन यांनी म्हटले आहे.